Nagpur News : राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्त्वाचा घटक असलेल्या बसस्थानकांचा कायापालट करण्यात एमआयडीसीने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आज एसटी महामंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ( MIDC) यांच्यात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.
विधानभवन येथे झालेल्या या करारप्रसंगी उद्योग मंत्री तथा एमआयडीसीचे अध्यक्ष उदय सामंत, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनोटीया, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व एसटीचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्यातील १९३ बस स्थानकांचे सौंदर्यीकरण व सुशोभिकरण होणार असून आहे. यासाठी एमआयडीसी आणि एसटी महामंडळ यांच्यात ६०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला.
राज्यभरात एसटीची ६०९ बसस्थानके आहेत. त्यापैकी सध्या ५६३ बसस्थानके कार्यरत आहेत. बसस्थानक परिसरातील खड्डे , पावसाळ्यात पाणी साचून होणारा चिखल यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतो. एसटी बसेसचे देखील नुकसान होते. यावर कायमचा उपाय म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आर्थिक मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी एसटीच्या अमृतमहोत्सवी समारंभात केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
यानुसार पहिल्या टप्प्यात MIDC १९३ एसटी बसस्थानकांच्या कॉक्रिटीकरणासाठी ५०० कोटी रुपये व रंगरंगोटी ,किरकोळ दुरुस्ती करण्याची १०० कोटी रुपये खर्चाची निविदा प्रक्रिया राबविणार आहे. यातून लवकरच या सर्व बसस्थानकांचा कायापालट होणार आहे.
एमआयडीसीच्या या प्रतिसाद आणि पुढाकाराने मुख्यमंत्री शिंदे यांनी कौतुक केले. राज्यातील लोकाभिमुख सुविधा आणि अग्रेसर अशा उद्योग विभागाचे नवे सहकार्य पर्व सुरू होणार आहे. यातून एक वेगळे उदाहरण पुढे आल्याचेही, त्यांनी नमूद केले.
Share your comments