श्रीलंकेमध्ये उद्भवलेल्या परकीय चलन डॉलरच्या कमतरतेमुळे श्रीलंकेच्या आर्थिक अडचणी मध्ये कमालीची भर पडली आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून भारतीय कांदा निर्यात दारांचे पैसे वेळेत मिळण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय कांदा निर्यात दारांचे जवळजवळ 120 कोटी रुपये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशीच परिस्थिती श्रीलंकेत चालू राहिली तर लाल कांद्याचा निर्यातीचा प्रश्न हा गंभीर स्वरूप धारण करेल अशी शक्यता आहे.
कांद्याचा विचार केला तर भारतातून दर आठवड्यात श्रीलंकेत दोनशेकंटेनरमधून जवळपास पाच हजार टन कांदा निर्यात होतो. एक टनाचा भाव तीस हजार रुपये असून श्रीलंकेत निर्यात झालेल्या कांद्याचे किती पैसे अडकले आहेत याची नेमकेपणाने कल्पना येण्यास मदत होते असे निर्यातदारांनी सांगितले.
श्रीलंकन सरकारने कांद्याच्या आयातीवर 40 रुपये किलो असे आयात शुल्क लागू केल्याने भारतातून होणारी कांद्याचे निर्यात जवळपास थांबल्यातजमा आहे. जर श्रीलंकेमधील स्थानिक कांद्याचा विचार केला तर तो विक्रीसाठी बाजारात येत आहे. परंतु तिकडे अन्नधान्याच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर 105 रुपये किलो भावाने विकला जात आहे. श्रीलंकेला त्यांच्या स्थानिक कांदा हा जवळपास दोन महिने पुरेल इतका आहे. त्यानंतर त्यांना भारतीय कांद्यावर अवलंबून राहण्या शिवाय पर्याय नाही.
परंतु भारतीय निर्यात दारांचे मागील थकलेले पैसे मिळाले नाही तर लाल कांदा पाठवण्यास निर्यातदार कितपत तयार होतील हा मोठा प्रश्न आहे. शिवाय बँक गॅरंटी ची समस्या श्रीलंकेत बिकट बनल्याने बऱ्याच भारतीय निर्यातदारांनी उधारीवर माल दिलेला आहे. त्यामुळे भारतीय कांदा निर्यातदारांचे श्रीलंकेतून पैसे मिळण्याकडे लक्ष लागलेले आहे.
Share your comments