1. बातम्या

शेतकऱ्यांवर नवं संकट; मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे आक्रमण


खरिपाची पेरणी होऊन महिनाही झाला नाही तोच राज्यभरातील शेतकऱ्यांना आणखी एका चिंतेने ग्रासले आहे. मका पीक लागवड केलेल्या शेतकऱ्यांना अमेरिकन लष्करी अळीचे संकट आले आहे. (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा )  या अळीने मका पिकावर हल्ला चढवला आहे. सध्या अनेक ठिकाणी कमी अधिक असलेला प्रादुर्भाव येणाऱ्या काळात वाढण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात ५० टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव असल्याचे सूत्रांनी सांगितले. यंदाचा खरीप शेतकऱ्यांना कसोटीचा ठरत आहे, आधी बियाणे निकृष्ट निघाल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर असतानाच आता मक्यावर लष्करी अळीने चाल केली आहे.

राज्यातील सर्वच मका उत्पादक जिल्ह्यांमध्ये  अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे अळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना फवारण्या करव्या लागत आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेळगाव, निमगाव, वळकुटे, अंथुर्णे ॉ, वालचंदनगर, कळस, भिगवण, बावडा, भातनिमगाव, लाखेवाडी, डहाळज, रुई, न्हावी, परिसरात, एक ते दीड हजार हेक्टरवर लष्करी अळीचा ४० ते ५० टक्के प्रादुर्भाव झाला आहे. दौड, बारामती, जुन्नर, खेड, शिरुर, आंबेगाव तालुक्यांमध्येही प्रादुर्भाव होण्याची भीती आहे.  सोलापूर  जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, माळशिरस, अक्कलकोटच्या काही भागांत लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसत आहेत.  पांढरे ठिपके असल्याचे, पाने कुरतडली गेले आहेत. यासह कोंबात अळीची अंडी उबल्याचेही दिसत आहे.  नगर जिल्ह्यात सहा ते सात हजार हेक्टर क्षेत्रावर अळीने आक्रमण केले असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.

 


चार दिवसांपासून पाऊस थांबल्याने प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नाशिक जिल्ह्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा ३ ते ४ टक्के प्रादुर्भाव झाला आहे. आधी देवळा व सटाणा तालुक्यातील काही भागात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला होता. मात्र वेळीच उपाययोजना केल्याने व पाऊस झाल्याने प्रादुर्भाव कमी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर, सिल्लोड, फुलंब्री, तालुक्यातील काही ठिकाणी  मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

दुसरीकडे जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद, जालना तालुक्यात काही ठिकाणी अळी मका पिकावर आक्रमण करत असल्याचे निदर्शनास आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात मक्याची लागवड १ ते १० जून दरम्यान झालेली आहे.  पीक साधऱण पंधरा दिवसाचे झाले असून पाने आणि पोंग्यामध्ये अळी दिसून येत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी अमेरिकन अळीने लवकर आक्रमण केले आहे. काही ठिकाणी असलेल्या ज्वारीवर देखील या अळीचा प्रादर्भाव दिसत आहे.

कसे मिळवाल नियंत्रण  -

  • वेळेवर कोळपणी व खुरपणी करुन शेत तणमुक्त ठेवावे.
  • अंडीपूंज, समूहातील लहान आणि मोठ्या अळ्या हाताने वेचून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.
  • सामूहिकरीत्या मोठ्या प्रमाणात नर पतंग आकर्षित करुन मारावेत. यासाठी १५ कामगंध सापळे प्रतिएकरी लावावेत.
  • पीक तीन दिवसांपर्यंतचे असल्यास बारीक वाळू किंवा बारीक वाळू व चुन्याचे ९ :१ प्रमाण करुन पोंग्यात टाकावे.
  • ट्रायकोग्रामा प्रीटीओसम किंवा टीलेनोमस रेमस या मित्रकिटांची परोपजीवीग्रस्त ५० हजार अंडी प्रतिएकर एक आठवड्याच्या अंतराने तीन वेळा शेतात सोडावीत.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters