नाशिक : एखादी परंपरा तोडून नवीन काहीतरी अगळा वेगळा पायंडा पाडणं हे सर्वांसाठी मोठं जिकिरीचे काम असते. मग ते आपल्या संस्कृतीविषयी असो किंवा आपल्या व्यवसायातील असो. परंपरागत शेती पिकांऐवजी शेतकरीही वेगळा विचार करू शकत नाही. सर्वजण ज्या पिकांचे उत्पन्न घेत आहेत तेच आपण घ्यायचं असं आपोआप जुळलेलं गणितच असतं.
ही परंपरा मोडून काढण्याचं काम एकट्या दुकट्याने होत नाही. सर्व गाव जेव्हा याची पीक परंपरा मोडण्याचा प्रयत्न करते तेव्हाच नवीन एक पद्धत आणि इतिहास घडत असतो. अशाच एक इतिहास निफाड तालुक्यातील शिंगवे गावाने केला आहे. निफाड तालुक्यातील गोदकाठा परिसरातील शिंगवे गावाने पारंपारिक उसाच्या शेतीला फाटा देत गाजराची शेती (Carrot Farming) करत गावाला आगळा वेगळा नावलौकिक मिळवून दिला आहे. पारंपारिक शेतीला फाटा देत गाजराच्या शेती करुन गावातील शेतकऱ्यांनी गाजर शेतीच्या माध्यमातून मोठी आर्थिक कमाई केली आहे.
हेही वाचा : हरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान
गोदावरी, दारणा आणि कादवा या तीन नद्यांच्या संगमावर नांदूरमध्यमेश्वर धरण निफाड तालुक्यात ब्रिटिश कालीन काळात बांधण्यात आले आहे. गावापर्यंत नांदूरमध्यमेश्वर धरणाचे बॅक वॉटरच पाणी असते. त्यामुळे उसाची मोठी शेती केली जाते. उसाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून निफाड आणि नंतर रानवड साखर कारखानाची निर्मित करण्यात आली. मात्र कर्जबाजारीपणामुळे दोन्ही कारखाने बंद पडल्याने ऊसाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी वेगळे काही तरी करावे म्हणून गोदकाठा परिसरातील शिंगवे गावातील शेतकऱ्यांनी उसाच्या शेतीला फाटा देत गाजराच्या शेतीला प्राधान्य दिले.
गाजराच्या शेतीतून भरघोस नफा
दररोज एक हजार क्विंटल गाजर वाशी, कल्याण, पुणे, अहमदाबाद, सुरत आणि नाशिक याठिकाणी पाठवले जात आहे. या गाजरांना चांगली मागणी असल्याने 1 हजार ते 1500 रुपये प्रति क्विंटलला बाजार भाव मिळत आहे. या गाजरातून फायदा होत असल्याने गाजर उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
शिंगवे गावाचा जिल्ह्यात गाजावाजा
शिंगवे गावच्या गाजर पॅटर्नने जिल्हाभरात गावाचा गाजावाजा आहे. पारंपारिक शेतीला फाटा देऊन नवं काहीतरी करुन देखील उत्पन्न मिळवता येतं, हेच शिंगवे गावच्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलंय. शासन आणि प्रशासन पातळीवर शिंगवे गावची वाहवा होत आहे.
Share your comments