1. बातम्या

कामगारांना घेऊन धावली विशेष रेल्वे ; कामगार पोहचणार आपल्या घरी

KJ Staff
KJ Staff


आज कामगार दिन साजरा केला जात आहे. आजच कामगारांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे अनेकजणांना आपल्या घरच्यांपासून परदेशी अडकून राहावे लागले. इतर विविध राज्यात इतर राज्यातील मजूर अडकले होते. लॉकडाऊन वाढविण्यात आल्यानंतर कामगारांचा घराकडे जाण्याचा ओढा वाढला आणि त्यामुळे रस्त्यावर उतरलेली तुफान गर्दी हे चित्र आपण पाहिले आहे. परंतु हातात काम नसल्याने आणि मिळत असलेले अन्न पुरेसे नसल्याने दुसऱ्या राज्यात अडकलेले कामगार आपल्या घरी जाण्यासाठी सरकारकडे विनंती करु लागले होते. काही मजूरांनी पायीच आपल्या प्रवास सुरू केला होता. कामगारांची होणारी परवड पाहून सरकारने मजुरांना आपल्या घरी जाण्याची परवानगी दिली आहे. यासाठी सरकारने एक विशेष रेल्वे सुरू केली. या रेल्वेतून मजूर आपल्या घरी परतणार आहेत. 

लॉकडाउननंतर वेगवगेळ्या राज्यांमध्ये अडकून पडलेल्या स्थलांतरित कामगारांना स्वत:च्या राज्यामध्ये पाठवण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी अखेर रेल्वे मंत्रालयाने मान्य केली आहे. आज हैदराबादजवळील लिंगमपिल्ली येथून झारखंडमधील हटियासाठी कामगारांना घेऊन जाणारी विशेष गाडी सोडण्यात आली.  २५ मार्चपासून देशामध्ये लॉकडाउन सुरु झाल्यानंतर आज पहिल्यांदाच प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वेची विशेष गाडी धावली आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. तेलंगाणा सरकारने केलेल्या विनंतीनंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हैदराबादमधून हटियासाठी विशेष रेल्वे गाडी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे एएनआयने म्हटले आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशनानुसार झारखंडमधील कामगारांना त्यांच्या राज्यात जाता यावे म्हणून ही विशेष रेल्वे सोडण्यात आली. या रेल्वेला निरोप देण्यासाठी काही रेल्वेचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी लिंगपपिल्ली स्थानकावर उपस्थित होते. महिन्याभराहून अधिक काल लॉकडाउनमध्ये घालवल्यानंतर अखेर आपल्या राज्यात परत जातानाचा आनंद कामगारांच्या चेहऱ्यावर दिसत होता. अनेकजण खिडकीमधून हात बाहेर काढून रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा निरोप घेताना व्हिडिओत दिसत आहे.

तेलंगाणामधून झारखंडला रेल्वे गाडी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी अशाप्रकारच्या कोणत्या गाड्या कुठे सोडल्या जाणार आहेत यासंदर्भातील निर्णय केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार घेण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी एएनआयला सांगितले आहे. ज्या राज्यामधून ट्रेन सोडण्यात येणार आहे आणि ज्या राज्यात ती जाणार आहे अशा दोन्ही राज्यांच्या विनंतीनुसार केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने निर्णय घेऊन दिलेल्या आदेशांप्रमाणे पुढील नियोजन केले जाणार आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters