
Namo Shetkari Mahasanman yojana update
नमो किसान महासन्मान योजनेचा पहिला हप्ता गुरूवारी दि.26 रोजी शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार असून यासाठी कृषी विभागाने 1720 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत स्वत: पुढाकार घेवून अन्य अटींची पूर्तता करण्याबाबत ऑगस्ट महिन्यापासून विशेष मोहीम राज्य शासनामार्फत राबवली होती. या मोहिमेद्वारे राज्यातील 13 लाख 45 हजार शेतकरी पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी कायमस्वरूपी पात्र ठरले आहेत.
पीएम किसानच्या चौदाव्या हप्त्यात विविध कारणांमूळे लाखो लाभार्थी वंचित राहिल्याने कृषी विभागाअंतर्गत ही विशेष मोहीम राबविली होती. धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून कृषी विभागाने ही मोहीम हाती घेतल्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी, कृषिमित्र यांसह कर्मचाऱ्यांनी कॅम्प घेऊन, 13 लाख 45 हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण, बँक खाते संलग्न करणे, भूमिअभिलेख नोंदी पूर्ण करून घेणे या अटींची पूर्तता करुन घेतली आहे. या 13 लाख 45 हजार शेतकऱ्यांपैकी 9.58 लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे, 2.58 लाख शेतकऱ्यांचे खाते आधार संलग्न करणे, 1.29 लाख शेतकऱ्यांचे भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत करणे बाबत कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
जेव्हा पी एम किसान योजना नव्याने सुरू करण्यात आली त्यावेळी राज्यातील सुमारे 1 कोटी 19 लाख शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली होती. त्यांपैकी सुमारे 95 लाख शेतकरी पात्र ठरले. मात्र वरील अटींची पूर्तता न केल्याने पी एम किसान योजनेच्या 13 व्या आणि 14 व्या हप्त्यात 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला. आता 15 व्या हप्त्यासाठी ई-केवायसीची अट अनिवार्य करण्यात आली आहे.
Share your comments