यावर्षी सोयाबीनच्या दरात नाटकीय स्वरूपात दररोज चढ-उतार नमूद करण्यात येत आहे. सध्या विदर्भातील अमरावती जिल्ह्यात सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सोयाबीनचे दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल वर येऊन अडकल्याचे चित्र नजरेस पडत आहे. अनेक व्यापाऱ्यांनी आगामी फेब्रुवारी महिन्या नंतर सोयाबीनच्या दरात लक्षणीय वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली असल्याने जिल्ह्यातील नव्हे नव्हे तर राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक करण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सोयाबीनची दरवाढीची शक्यता वर्तवली गेली असल्याने अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीकडे पाठ फिरवली परिणामी बाजारपेठेत सोयाबीनची आवक मंदावली आहे.
या खरीप हंगामात जवळपास अडीच लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीनच्या लागवडीखालील असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र खरीप हंगामातील एवढ्या मोठ्या क्षेत्रावर अवकाळी नामक ग्रहण लागले होते, ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली असल्याने जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्राखालील सोयाबीन अवकाळी पावसाच्या चपाट्यात सापडले होते. त्यामुळे सोयाबिनच्या उत्पादनात घट झाल्याचे सांगितले जात आहे. सोयाबिनच्या उत्पादनात घट झाल्याने प्रारंभी सोयाबीनला चांगला विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला होता, हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनला दहा हजार रुपयांपर्यंत बाजार भाव प्राप्त झाला. मात्र मध्यंतरी केंद्र शासनाच्या एका निर्णयाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची पुरती वाट लावून टाकली. त्याचं झालं असं मध्यंतरी केंद्र सरकारने सोयापेंड आयातीला परवानगी देऊन टाकली त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत सोयाबीनच्या मागणीत मोठी घट झाली आणि परिणामी सोयाबीनच्या दरात अचानक मोठी घट नमूद करण्यात आली.
सोयाबीनचे दर चार हजार रुपये प्रतिक्विंटल वर येउन ठेपले होते, त्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील गणित आत्मसात करून सोयाबीनचे दर कमी असताना सोयाबीन साठवणुकीवर विशेष लक्ष दिले आणि जेव्हा सोयाबीनचे दर वधारले तेव्हा सोयाबीनची विक्री सुरू केली. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या या निर्णयामुळे सोयाबीनचे दर वाढल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत होते. अलीकडे सोयाबीनला अमरावती जिल्ह्यासमवेत संपूर्ण राज्यात सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव प्राप्त आहे. मात्र काही व्यापाऱ्यांनी आगामी काही दिवसात सोयाबीनचे दर वधारणार असल्याचे भाकीत सांगितलं असल्याने अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पुनश्च एकदा सोयाबीन साठवणूक करण्याला पसंती दर्शवली आहे. तसेच काही गरजू शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत आपला संपूर्ण सोयाबीन विक्रीदेखील करून टाकला आहे. यामुळे सध्या बाजारपेठेत सोयाबीनची आवक कमी झाल्याचे बघायला मिळत आहे.
काही व्यापाऱ्यांनी जरी आगामी काही दिवसात सोयाबीनचे दर वधारणार असल्याचे सांगितले असले तरी अनेक व्यापारी या गोष्टीवर सहमत दिसत नाही. काही व्यापाऱ्यांच्या मते, देशात या हंगामात समाधान कारक सोयाबीनचे उत्पादन प्राप्त झाले आहे, तसेच अनेक सोयाबीन उत्पादक देशांमध्ये देखील सोयाबीनचे विक्रमी उत्पादन नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सध्यातरी सोयाबीनचे भाव वाढणार नसल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत आहे. एकंदरीत परिस्थीती बघता सोयाबीनच्या दराबाबत सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये मतभेद बघायला मिळत आहे.
Share your comments