सोयाबीनचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यातुन आनंदाची बातमी समोर येत आहे. खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात मोठी घट झाली होती, उत्पादनात घट झाली म्हणून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सर्व आशा सोयाबीनच्या दरावरच होत्या. उत्पादनात घट झाली असली तरी हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली होती, हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनला खूपच नगण्य बाजार भाव मिळत होता. हंगामाच्या मध्यंतरी मात्र, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या योग्य नियोजनामुळे बाजारपेठेत सोयाबीनला तेजी बघायला मिळाली.
जेव्हा बाजारपेठेत सोयाबीनला समाधानकारक बाजार भाव मिळत नव्हता तेव्हा शेतकऱ्यांनी त्याची साठवणूक करून ठेवली, शेतकऱ्यांच्या या निर्णयामुळे सोयाबीनचे बाजार भाव चांगले वधारले. त्यानंतर सोयाबीनचे बाजार भाव बराच काळ स्थिर बघायला मिळाले मात्र आता पुन्हा एकदा सोयाबीन चा हंगाम अंतिम टप्प्यात असताना सोयाबीनच्या बाजार भावात वाढ होतांना बघायला मिळत आहे. सोयाबीनसाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या लातूर मार्केट मध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याने पुन्हा एकदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. मागील आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात जवळपास 400 रुपयांनी वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले. आज सोयाबीन सहा हजार 550 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाला त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन हंगामचा शेवट गोड होणार अशी आशा आहे.
नव वर्षाच्या सुरुवातीला सोयाबीनच्या दरात घसरण झाली होती, आणि बराच काळ सोयाबीनचे दर स्थिर होते. आता हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे आणि हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने आता सोयाबीन उत्पादक शेतकरी साठवलेला सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत.
दुसरीकडे, कापसाचा शेवट देखील गोड होणार असल्याचे समजत आहे, कारण की खानदेश मधील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नंदुरबार मध्ये कापसाला या हंगाम मधील उच्चांकी म्हणजेच अकरा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला. सोयाबीन आणि कापसाच्या उत्पादनात कधी नव्हे ती विक्रमी घट झाली मात्र बाजार भाव समाधानकारक असल्याने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.
खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन पिकाला सध्या समाधानकारक बाजार भाव मिळत आहे. हंगाम आगामी काही दिवसात संपुष्टात येईल, मात्र ऐन हंगामाच्या शेवटी झालेली ही दरवाढ शेतकऱ्यांच्या गालावर हसू आणत आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठा सावध पवित्रा अंगीकारला होता. बाजारपेठेत चांगला दर मिळाला तेव्हा सोयाबीन आणि कापसाची विक्री करायची अशी शेतकऱ्यांनी मनाशी खूणगाठ बांधून घेतली होती, याचाच फायदा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झाला.
सध्या बाजारपेठेत सोयाबीन आणि कापसाला चांगला समाधानकारक बाजार भाव मिळत असल्याने लातूर एपीएमसीमध्ये सोयाबीनची उच्चांकी आवक नमूद करण्यात आली आहे. सोमवारी लातूरच्या बाजारपेठेत सोयाबीनच्या सोळा हजार पोत्यांची आवक बघायला मिळाली होती. त्यामुळे हंगामाच्या शेवटी साठवणूक केलेला सोयाबीन बाजारपेठेत दाखल होत असल्याचे सांगितले जात आहे. आगामी काही दिवस सोयाबीनच्या बाजारभावात जर अशी तेजी राहिली तर आवक मध्ये वाढ होण्याची आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Share your comments