या हंगामात सोयाबीनचे बाजार भाव ठरवण्यासाठी शेतकरी बांधवांकडे एक विशिष्ट प्रकारचे रिमोट गावले होते, सोयाबीन उत्पादक शेतकरी या रिमोटचा वापर करीत आणि आपल्या मर्जीने सोयाबीनचे बाजार भाव ठरवत होते. चालू हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी बाजारपेठेत सोयाबीनचे दर कमी होताच साठवणूक करण्याकडे लक्ष केंद्रित केले, त्यामुळे बाजारपेठेत तुटवडा निर्माण व्हायचा आणि परत सोयाबीनचे रेट गगन भरारी घ्यायचे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी अगदी सुयोग्य पद्धतीने बाजारपेठेतील गणित समजून घेतले आणि त्याची अंमलबजावणी देखील एखाद्या माहीर तज्ञाप्रमाणे केले.
नूतन वर्षाच्या पहिल्याच महिन्याच्या, जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात सोयाबीनच्या दरात थोडीशी वाढ झाली होती, मात्र वाढलेले दर जास्त काळ टिकले नाहीत आता जानेवारी महिना अखेर जवळ आले आहे आणि सोयाबीनच्या दरात घट होऊन सोयाबीनचे दर आता कमालीचे स्थीर बनले आहेत. शिवाय आता सोयाबीनचा हंगाम देखील शेवटच्या आणि निर्णायक टप्प्यात आला आहे. सोयाबीन चा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून देखील अनेक सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीन साठवणुकीवर विशेष लक्ष देत आहेत. सध्या बाजारात 6000 रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीनला बाजारभाव प्राप्त होत आहे, मात्र सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीनचे बाजार भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. परंतु सोयाबीनला बाजारपेठेत आता आधी सारखी मागणी नजरेस पडत नाहीये, तसेच हा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून आगामी काही दिवसात उन्हाळी हंगामातील सोयाबीन देखील बाजारपेठेत हजेरी लावणार आहे. तसेच उन्हाळी हंगामात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड करण्यालाच पसंती दर्शवली आहे त्यामुळे उन्हाळी हंगामातील सोयाबीन पिकाचे लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे.
या सर्व एकंदरीत गोष्टींचा विचार करता अंतिम टप्प्यात आणि विशेषता आगामी काही दिवसात मोठ्या प्रमाणात उन्हाळी सोयाबीन बाजारपेठेत दाखल होण्याच्या मार्गावर असताना या स्टेजवर सोयाबीनची साठवणूक करणे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे नुकसानीचे सिद्ध होऊ शकते. त्यामुळे या हंगामातील सोयाबीन आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हळूहळू का होईना विक्री करणे महत्त्वाचे आहे. मराठवाड्यातील लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 20,000 पोत्यांच्या आसपास सोयाबीनची आवक नजरेस पडत आहे, ही आवक सर्वसाधारण असली तरी देखील या हंगामात मागील वर्षा सारखी प्रचंड आवक झालेली नाही, यावरून हे स्पष्ट होत आहे की अजूनही अनेक सोयाबीन उत्पादक शेतकरी बाजार भावाच्या वाढीने सोयाबीन साठवणूक करत आहेत. दरवाढीची अपेक्षा बाळगणे कुठल्याही परिस्थितीत अयोग्य नाही मात्र, सध्याचे बाजारपेठेतील चित्र बघता, तसेच हंगाम अंतिम टप्प्यात आला असल्याने व आगामी काही दिवसात उन्हाळी सोयाबीन बाजारात दाखल होणार असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आता वाढीव दराची आशा न बाळगता सोयाबीन विक्रीवर अधिक भर देणे महत्त्वाचे आहे.
बाजारपेठेत दहा दिवसांपासून सोयाबीनचे दर हे सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दरावर येऊन फिक्स झाले आहेत. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते आणि बाजारपेठेतील चित्र बघता आता पुढील काही दिवस सोयाबीनचे दर याच स्थितीत कायम राहतील. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी विनाकारण आगामी काळात धोका सहन करून न घेता टप्प्याटप्प्याने का होईना सोयाबीन विक्रीवर भर दिला पाहिजे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी सोयाबीन विक्री करून तापल्या तव्यावर पोळी भाजून घेण्याचा सल्ला दिला आहे. नाहीतर तेलही जाईल तूपही जाईल आणि हातात फक्त धुपाटणेच शिल्लक राहील.
Share your comments