
Soyabean decrease
या हंगामात सोयाबीनचे दर हे अनपेक्षित रित्या खालीवर होताना नजरेस पडले आहेत. सुरुवातीस सोयाबीनला दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव प्राप्त झाला होता. मात्र त्यानंतर सोयाबीनचे बाजार भावाला उतरती कळा लागली. मध्यंतरी केंद्रसरकारने सोयापेंड आयातीला परवानगी दिल्याने सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाल्याचे तज्ज्ञांद्वारे सांगितले गेले होते. मात्र नंतर सोयाबीन उत्पादक शेतकरी व्यापाऱ्यांच्या भूमिकेत आला, बाजारपेठेचे चित्र बघून सोयाबीन विक्री करायची की नाही हे ठरवू लागला. बाजारपेठेत सोयाबीनचे दर कमी झाले की सोयाबीन उत्पादक शेतकरी साठवणूकीकडे भर द्यायचे आणि सोयाबीनचे दर वाढलेत की सोयाबीन उत्पादक शेतकरी टप्प्याटप्प्याने आपला सोयाबीन विक्री करायचा.
शेतकऱ्याच्या या व्यापारी दृष्टिकोनामुळे आणि बाजारपेठेच्या चांगल्या अभ्यासामुळे सोयाबीनचे भाव ठरवण्यात शेतकऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या यवतमाळ जिल्ह्यात हंगामाच्या शेवटी शेवटी सोयाबीनला 5 हजार 800 ते 6 हजार 300 रुपये प्रति क्विंटल एवढाच दर प्राप्त होत आहे. मध्यंतरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या निर्णयामुळे जे दर 6 हजार 700 रुपये पर्यंत बराच काळ टिकले होते ते दर आता 400 रुपयांनी खाली आल्याचे जिल्ह्यात चित्र दिसत आहे.
केंद्र सरकारच्या सोयापेंड आयातीच्या निर्णयामुळे देशात मोठ्या प्रमाणात बाहेरून सोयापेंड आले आहे तसेच आपल्या देशाची सोयाबीन निर्यात केल्यास बाहेर देशात त्याला कमी मागणी मिळत असल्याचे तज्ज्ञांद्वारे सांगितले गेले आहे.
यासोबतच आता सोयाबीन चा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी साठवलेला सोयाबीन विक्रीसाठी लगबग सुरु केली आहे. त्यामुळे बाजारपेठेत सोयाबीनचे दर कमी होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र असे असले तरी अजूनही अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची अपेक्षा आहे. मात्र शेतकऱ्यांची ही आशा कितपर्यंत योग्य आहे हे तर भविष्यातील सोयाबीनचे दर सांगतील.सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मते, सोयाबीन आता अंतिम टप्प्यात आला असल्याने आणि सोयाबीनची मागणी लक्षणीय कमी झाली असल्याने आता सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता अगदीच नगण्य आहे.
व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना गरजेनुसार सोयाबीन विक्री करण्याचा सल्ला दिला आहे, सध्या बाजारात सोयाबीनची आवक अचानक वाढली असल्याने सोयाबीनचे दर खाली गेले असल्याचे देखील व्यापाऱ्यांनी यावेळी नमूद केले. बाजारपेठेतील एकंदरीत परिस्थीती बघता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आता गरजेनुसार टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री चालू ठेवावी.
Share your comments