1. बातम्या

निकृष्ट बाजरी बियाणांमुळे पेरणी वाया; शेतकऱ्यांना आर्थिक फटका

KJ Staff
KJ Staff


यंदा जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी लवकरच पेरण्या उरकल्या. मॉन्सूनचा पाऊस होताच शेतकऱ्यांनी पेरण्याच्या कामांना गती देत पेरण्या पूर्ण केल्या. परंतु  बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. दौंड तालुक्यातील काही शेतकऱ्यांनाही निकृष्ट दर्जाच्या बियाणांचा फटका बसला आहे.

दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांनी या हंगामामध्ये आपल्या शेतामध्ये विविध कंपन्यांचे बाजरीचे बियाणे पेरले.  परंतू  ते बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याने त्याची उगवण न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामूळे खडकी येथील अनेक शेतकऱ्यांनी खडकी (  ता.दौंड ) ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या आहेत.त्यामूळे ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करुन नुकसान भरपाई मिळवण्यासाठी कार्यवाही व्हावी यासाठी तालूका कृषी अधिकारी अप्पासाहेब खाडे आणि दौंड पंचायत समितीचे कृषी अधिकारी नंदन जरांडे यांच्याकडे बुधवार (ता.१ )रोजी तक्रार अर्ज दाखल केला आहे.

 दौंड तालुक्याच्या पुर्व भागातील रावणगाव, खडकी, मळद , स्वामी चिंचोली या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बाजरीची पेरणी केली. मात्र, बियाणे नित्कृष्ट दर्जाचे निघाल्याने बहुतांशी भागात उगवणच झाली नसल्याचे दिसून आले आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी एकरी जवळपास ८ ते १० हजार रुपयांचा खर्च केला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी बियाणे देणारे डिलर, दुकानदार, ग्रामपंचायत यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. तरी बोगस बियाण्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांनी विविध जातीचे बाजरीचे बियाणे पेरले होते. परंतु १० - १२ दिवसात देखील ते उगवून न आल्याने माझ्यासह अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले  आहे.तरी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.त्यांना तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. - किरण काळे - मा.सरपंच ग्रामपंचायत खडकी ता.दौंड.

 

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters