ऐश्वर्या राठोड, डॉ. आदिनाथ ताकटे
शाश्वत पीक उत्पादकतेच्या दृष्टीकोनातून जमीन आरोग्य आणि अन्नद्रव्ये व्यवस्थापनास अनन्य साधारण असे महत्व आहे. योग्य व्यवस्थापनेच्या अभावामुळे जमिनीच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अधिकाधिक उत्पादनासाठी तीव्रतेने जमिनीचा वापर होत आहे. त्या तुलनेत अन्नद्रव्यांचे पुर्नभरण जमिनीत होत नाही. परिणामी जमिनीची सुपिकता खालावत चालल्याचे आढळून येत आहे. शाश्वत शेती व्यवस्थापनामध्ये जमिनीचे आरोग्य अबाधित राखुन किफायतशीर पीक उत्पादन घेण्यासाठी सेंद्रिय खताबरोबरच रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक असते. जमिनीची सुपिकता आजमाविण्यासाठी भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्माची तपासणी करणे आवश्यक असते.
आपली लाख मोलाची जमिनी चिरकात, चिरंजी वी व शाश्वत ठेवण्याकरीता माती आणि पाणी परिक्षण करून खत व्यवस्थापन व पिकांचे नियोजन करावे. माती परिक्षणामुळे जमिनीच्या सर्व गुणधर्माची माहिती मिळते. जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते आणि त्यानुसार रासायनिक खतांच्या मात्रा व शिफारशी ठरविणे सुलभ होते. त्यामुळे रासायनिक खतांवर होणारा अनावश्यक खर्च टाळता येतो. अन्नसुरक्षा आणि सुरक्षित अन्न या दोघांमध्ये संतुलन साधण्यासाठी मातीचे आरोग्य जपावेच लागेल.
माती परिक्षण
माती परिक्षण म्हणजे मातीची भौतिक तपासणी, रासायनिक व जैविक साधारणपणे जमिनीचा सामू, विद्राव्य क्षारांचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र स्फुरद व पालाश याकरिता परिक्षण केले जाते. त्यातून जमिनीतील अन्नद्रव्यांच्या प्रमाणाविषयी माहिती मिळते. परिणामी पिकांच्या आवश्यकतेनुसार अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा करता येतो.
माती परिक्षणाचे प्रमुख घटक
मातीचा प्रातिनिधिक नमुना घेणे.
माती नमुन्यांचे प्रयोगशाळेत परिक्षण करणे
माती परिक्षणाचा अहवाल तयार करणे.
पिकांसाठी खतांच्या शिफारशी ठरविणे.
क्षार व चोपणयुक्त जमिनी सुधारण्याचे उपाय सुचविणे.
माती परिक्षणाचे फायदे
जमिनीतील घटकांचे प्रमाण तसेच जमिनीतील दोष समजतात.
जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड व नियोजन करता येते.
जमीन सुधारण्यासाठी नियोजनबध्द उपाययोजना करता येतात.
खतांची संतुलीत मात्रा मिळाल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते.
आवश्यक तेवढेच खत दिल्यामुळे आर्थिक बचत होते.
जमिनीत संतुलीत खतांचा पुरवठा झाल्यामुळे तिची उत्पादन क्षमता टिकून राहते.
माती परिक्षणामुळे जमिनीची सुपिकता आजमावता येते व जमिनीचे प्रकार निश्चित करता येतात.
मातीचा नमूना घेताना घ्यावयाची काळजी
१.मातीचा नमूना घेण्यासाठी वापरात येणारी अवजारे उदा. फावडे, कुदळ, घमेले, खुरपी इत्यादी स्वच्छ असावीत.
२.मातीचा नमुना साधारणपणे पिकाची काढणी झाल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वी घ्यावा, शेतात पीक असल्यास दोन ओळीतील जागेतून नमुना घ्यावा.
३.पिकास रसायनिक खत दिले असल्यास तीन महिन्याच्या आंत संबंधित जमिनीतून माती नमूना घेवू नये.
४.निरनिराळ्या प्रकाराच्या जमिनीचे किंवा निरनिराळ्या शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत.
५.माती नमूना गोळा करताना किंवा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविताना रासायनिक खताच्या रिकाम्या पिशव्या मातीचा नमुना घेण्यासाठी वापरू नयेत.
६.शेतामधील खते साठविण्याची जागा, कचरा टाकण्याची जागा, जनावरे बसण्याची जागा, झाडाखालील जागा, विहिरीजवळ, पाण्याचे पाट व शेताचे बांध इत्यादी जागामधून किंवा जवळून मातीचे नमूना घेवू नयेत.
७.शक्य तितक्या लवकर नमुने प्रयोगशाळेत पाठवा. सर्वसाधारणपणे नमुना काढणे व प्रयोगशाळेत पाठविणे ह्यात दोन आठवड्यापेक्षा अधिक काळ नसावा. अन्यथा माती पृथःकरण बदलण्याची शक्यता असते.
८.फळबागेसाठी मातीचा नमुना वेगवेगळ्या थरामधून घ्यावा उदा. खड्डा खोदून पहिल्या एक फुटातील ३० सेमी पर्यंत मुरूम नसल्यास ३० ते ६० सेमी थरातील दुसरा धर व खोल जमिनीत ६० ते ९० सेमी पर्यंत खोलीतील तिसऱ्या थरातील मातीचे नमुने स्वतंत्र घ्यावे व प्रयोग शाळेत पाठवावे.
९.जमीन क्षारयुक्त व क्षारयुक्त- चोपण असल्यास पृष्ठभागावरील दोन सेमी मधील क्षार बाजूला करुन नंतरच नमुना घ्यावा.
१०.सुक्ष्म अन्नद्रव्ये तपासणी करावयाची असल्यास लाकडी खुंटी अथवा लाकडी औजाराने मातीचा नमुना घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत लोखंडी अथवा अन्य धातुंची अवजारे अथवा उपकरणे, माती नमुना घेण्यासाठी वापरु नका. सुक्ष्म अन्नद्रव्यांसाठी माती नमुना घेताना जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचे आहे. पिशवीवर सुक्ष्मअन्नद्रव्ये तपासणीसाठी नमुना अशी नोंद करावी.
मातीचा नमुना घेण्याची पध्दत
मातीचा नमुना काढण्यासाठी शेतात गेल्यानंतर प्रथम शेतीची पाहणी करावी व जमिनीच्या प्रकारानुसार उतार, रंग, पोत, खोली, व्यवस्थापन व पीक पध्दतीनुसार विभागणी करावी आणि प्रत्येक विभागातून स्वतंत्र्यरित्या वेगळा प्रातिनिधीक नमुना घ्यावे.
साधारणपणे मातीचे नमुने खालील उद्देशांसाठी घेतले जातात
•जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासून त्याप्रमाणे खतांचा पुरवठा करणे.
•फळबाग लागवडीसाठी माती परीक्षण करणे.
•खारवट किंवा चोपण जमिनी सुधारण्यासाठी मातीची तपासणी करणे.
१.जमिनीचा रंग, खोली, पोत, उंच सखलपणा, चोपण जागा, पाण्याचा निचरा इत्यादी बाबी विचारात घेऊन सर्वसाधारण सारख्या असणाऱ्या जमिनीचे विभाग पाडावेत.
२.जमिनीच्या प्रकारानुसार स्वतंत्र मातीचे नमुने घ्यावेत आणि प्रत्येक प्रकारात अंदाजे २० ठिकाणचा नमुना घ्यावा. मात्र हे क्षेत्र ४ हेक्टरपेक्षा जास्त नसावे.
३.नमुना ज्या ठिकाणचा घ्यावयाचा आहे त्या ठिकाणच्या जमिनीवरील काडीकचरा, धसकटे, दगड बाजुला करावीत.
४.कुदळ किंवा फावड्याच्या सहाय्याने इंग्रजी 'V' आकराचा खड्डा घेऊन त्यामधून माती नमुना जमिनीच्या पृष्ठभागापासून तळापर्यंत खुरप्याने खरडून घ्यावा.सपाट पृष्ठभाग असलेल्या जमिनीवर ३०x३०x३० सेमी आकाराचा चौकोनी खड्डा करुन आतील माती बाहेर काढून टाका. खड्ड्याच्या सर्व बाजुची २ सेमी जाडीची माती खुरप्याच्या सहाय्याने वरपासून खालपर्यंत खरडून हातावर काढा आणि प्लॅस्टीकच्या घमेल्यामध्ये टाका. अशारितीने एका प्रभागातून १० नमुने घेऊन त्याच घमेलेत टाका.
पिकानुसार मातीचा नमुना घेण्यासाठी खड्ड्याची खोली:
अ.क्र. पिकाचे नांव-खड्डयाची खोली (सें.मी.)
१.हंगामी पिके २० सें.मी. पर्यंत (वितभर)
२.उस/कापूस इ. नगदी पिके ३० सें.मी. पर्यंत (१ फूट)
३.फळ पिके १०० सें.मी. पर्यंत (१ मिटर) वेगवेगळ्या धरातून
५.सर्व माती एका स्वच्छ प्लॅस्टीकच्या कागदावर टाका, चांगली मिसळा व नंतर माती पसरून मधोमध अधिक चिन्ह करून तिचे चार समान भाग करावेत. समोरासमोरील दोन भाग काढून टाकावेत. नंतर उरलेले दोन भाग एकत्र करून पुन्हा समान चार भाग करावेत व समोरासमोरील दोन भाग काढून टाकावेत आणि उरलेले दोन भाग पुन्हा एकत्र मिसळावेत व पुन्हा अधिक चिन्ह करून वरीलप्रमाणे क्रिया पुन्हा करावी. ही क्रिया अर्धा ते एक किलो माती शिल्लक राहितोपर्यंत करावी.
६.ओली माती असल्यास ती सावलीत वाळवावी. वाळलेली माती स्वच्छ कापडी पिशवीत भरावी व पिशवीत माहिती पत्रक टाका व एक लेबल पिशवीला बांधा.
७.शक्य तितक्या लवकर नमुने प्रयोगशाळेत पाठवा. सर्वसाधारणपणे नमुना काढणे व प्रयोगशाळेत पाठविणे ह्यात दोन आठवड्यापेक्षा अधिक काळ नसावा. अन्यथा माती पृथःकरण बदलण्याची शक्यता असते.
८.फळबागेसाठी मातीचा नमुना वेगवेगळ्या थरामधून घ्यावा उदा. खड्डा खोदून पहिल्या एक फुटातील ३० सेमी पर्यंत मुरूम नसल्यास ३० ते ६० सेमी धरातील दुसरा धर व खोल जमिनीत ६० ते ९० सेमी पर्यंत खोलीतील तिसऱ्या थरातील मातीचे नमुने स्वतंत्र घ्यावे व प्रयोग शाळेत पाठवावे.
९.जमीन क्षारयुक्त व क्षारयुक्त- चोपण असल्यास पृष्ठभागावरील दोन सेमी मधील क्षार बाजूला करून नंतरच नमुना घ्यावा.
१०.सुक्ष्म अन्नद्रव्ये तपासणी करावयाची असल्यास लाकडी खुंटी अथवा लाकडी औजाराने मातीचा नमुना घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत लोखंडी अथवा अन्य धातुंची अवजारे अथवा उपकरणे, माती नमुना घेण्यासाठी वापरु नका. नमुना स्वच्छ पिशवीत भरुन सुक्ष्म अन्नद्रव्यांसाठी माती नमुना घेताना जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचे आहे. पिशवीवर सुक्ष्मअन्नद्रव्ये तपासणीसाठी नमुना अशी नोंद करावी.
मातीच्या नमुना कोठे व कसा पाठवाल
मातीचा नमुना घेतल्यानंतर खालील माहिती लिहून ती, मातीचा नमुना असलेल्या पिशवीत टाकावी, मातीचा नमुना लवकरात लवकर जवळच्या माती परिक्षण प्रयोगशाळेकडे पाठवावा.
शेतकऱ्यांचे पूर्ण नांव
पूर्ण पत्ता
गट नंबर/सर्व्हे नं.
बागायत/कोरडवाहू
ओलीताचे साधन
जमिनीचा निचरा
जमिनीचा प्रकार (हलकी/मध्यम/भारी)
जमिनीचा उतार (जास्त/मध्यम/सपाट)
जमिनीची खोली (उथळ/मध्यम खोल/खोल)
जमिनीचा रंग (भुरकट/काळी)
नमुना घेतल्याची तारीख
मागील हंगामात घेतलेले पीक व त्याचे उत्पादन, वापरलेली खते व त्यांचे प्रमाण
पुढील हंगामात घ्यावयाची पिके, त्यांची जात व अपेक्षित उत्पादन
पाणी परिक्षण
पाणी परिक्षण म्हणजे पाण्याचा प्रातिनिधिक नमुन्याची प्रयोगशाळेत रासायनिक गुणधर्माची तपासणी होय.
पाणी परिक्षणाचे महत्व
शेतात सिंचनासाठी वापरावयाच्य पाण्याची प्रत ही त्यामध्ये असणाऱ्या विद्राव्य क्षारांचे प्रमाण, सामू, सोडियमचे अधिशोषीत गुणोत्तर, अवशेषात्मक सोडियम कार्बोनेट, क्लोराईडस्, बोरॉन, नायट्रेट नायट्रोजन इ. रासायनिक गुणधर्मावर अवलंबून असते. सिंचनाच्या पाण्यामध्ये विद्राव्य क्षारांचे प्रमाण जास्त झाल्यास पिकांच्या वाढीवर अनिष्ठ परिणाम होतो. शिवाय जमिनीचे आरोग्य देखील चांगले राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्यतो चांगल्या प्रतीच्या पाणी सिंचनासाठी वापरणे आवश्यक आहे.
पाणी परिक्षणाचे प्रमुख घटक
•पाण्याचा प्रातिनिधिक नमुना घेणे.
•पृथःकरणासाठी पाण्याचा नमुना विशिष्ठ कालावधीत प्रयोगशाळेत पोहोच करणे.
•पाण्याचे पृथःकरणानुसार वर्गीकरण करून परिक्षण अहवाल तयार करणे.
•वर्गीकरणानुसार उपयोग सुचविणे.
पाण्याचा प्रातिनिधिक नमुना कसा घ्यावा
१.पाण्याच्या पृथःकरणासाठी अर्धा लीटर पाणी नमुना पुरेसा होतो. पाण्याचा नमुना स्वच्छ प्लॅस्टिकच्या अथवा काचेच्या बाटलीत घ्यावा.
२.विहिरीतून पाण्याचा नमुना घेतांना विहिरीच्या मध्य भागातील पाणी बादलीच्या सहाय्याने ढवळून काही बादल्या पाणी बाहेर उपसून टाकल्यानंतर पाण्याचा नमुना घ्यावा. तसेच कूपनलीकेतील पाणी घेतांना १० ते २० मिनीटे एकसारखी कूपनलिका चालून नंतर स्वच्छ प्लॅस्टिक अथवा काचेच्या बाटलीत पाणी नमुना घ्यावा.
३.नदी, ओढे, कालवा यांच्यामधील पाण्याचा नमुना घेतांना वाहत्या पाण्यामधून मध्य भागातील नमुना घ्यावा.
४.नमुना बाटलीत भरण्यापूर्वी बाटली त्या पाण्याने दोन ते तीन वेळा विसळून घ्यावी व घट्ट बुच बसवून २४ तासाच्या आत प्रयोगशाळेत पृथःकरणासाठी पाठवावा.
५.बाटलीसोबत शेतकऱ्याचे नांव व नमुना कशातून घेतला याबाबतची सविस्तर माहिती लिहिलेले लेबल बाटलीला लावावे.
६.पाण्याचा प्रातिनिधिक नमुना घेतल्यानंतर पृथःकरण अहवालानुसार सामू (आम्ल-विम्ल निर्देशांक) सर्वसाधारण किंवा विम्लधर्मी आहे हे पाहून त्यांचे वर्गीकरण करून पिकास योग्य की अयोग्य व त्यावरील शिफारस/उपाय तक्ता १ मध्ये दर्शविले आहेत.
तक्ता क्र. १ पाण्याचा सामू (आम्ल-विम्ल-निर्देशांक)
सामू प्रकार/प्रत शिफारस
६.५ ते ८.० चांगली (सर्वसाधारण) सर्व जमिनीस व पिकांना उपयुक्त
८.० पेक्षा जास्त विम्लधर्मी पिकास अयोग्य परंतु असे पाणी वापरावयाचे असल्यास क्षारांस प्रतिकार करणाऱ्या पिकांचीच निवड करावी उदा. ऊस, कापूस, गहू, बीट, कांदा इ.
पाण्याच्या पृथःकरण अहवालानुसार त्यामध्ये असणाऱ्या सोडियम कॅलशियम, मॅग्नेशियम, कार्बनिटस्, बायकार्बनिटस्, क्लोराईडस्, सल्फेट, बोरॉन व नायट्रेट नायट्रोजन यांचे एकमेकांशी असलेले प्रमाण तसेच विद्युत वाहकता, सोडियमचे अधिशोषीत गुणोत्तर, अवशेषात्मक सोडियम कार्बोनेट आदिंच्या प्रमाणावर पाण्याची प्रत ठरविली जाते शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यातील निरनिराळ्या घटकांवरून पाण्याच्या प्रतिचे वर्गीकरण तक्ता २ मध्ये दिली आहे.
लेखक - ऐश्वर्या राठोड, आचार्य पदवी विद्यार्थी, कृषिविद्या विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी, मो. ८४११८५२१६४
डॉ. आदिनाथ ताकटे, मृदा शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, मो. ९४०४०३२३८९
Share your comments