मृदा संवर्धन म्हणजे शेत जमिनीचे धूप होण्यापासून संरक्षण करणे. माणसाच्या मुलभूत गरजा लक्षात घेता प्रत्येक मूलभूत गरज ही जमिनीतून निघालेल्या उत्पादनावरच अवलंबून आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता प्रत्येक घरात अन्नाचा सुयोग्य पुरवठा होण्यासाठी जमिनीचा पोत टिकवून ठेवणे आवश्यक आहे. शेत जमिनीची सुपीकता ही तिच्या वरच्या थरातील मातीच्या सूक्ष्म कणांवर अवलंबून असते. साधारणतः जमिनीचा २.५ सेंमी थर तयार होण्यासाठी ४०० ते १००० वर्षाचा कालावधी लागतो. परंतु तोच थर वाहून जाण्यास क्षणभरही वेळ लागत नाही. ज्या जमिनीची धूप सतत होत राहते तशी तिची उत्पादकता कमी होत जाते याचा विपरीत परिणाम हा उत्पन्नावर होतो म्हणून नैसर्गिक समतोल राखून मृदा संवर्धन करणे गरजेचे आहे.
जमिनीची धूप : भूपृष्ठावरील मातीचे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतर होणे म्हणजे जमिनीची धूप होय. प्राणी व वनस्पती यांची हालचाल तसेच पर्जन्य यांचे परिणाम यामुळे भूपृष्ठावरील मातीचे कण एकमेकांपासून विलग होऊन ते वारा व पाणी यांच्यासोबत वाहून जातात त्यामुळे जमिनीची धूप होते. खडकांपासून उन, वारा, पाऊस, थंडी, उष्णता इत्यादींच्या परिणामामुळे विदारण प्रक्रियेने माती तयार होत असते. तसेच दाट झुडुपे यांच्या पासून पडणारा पाला पाचोळा साठूनळ्या नंतरही मती तयार होते. चुकीच्या मशागतीच्या पद्धती, प्राणी व मनुष्य यांचा जमिनीवर सततचा असणारा वावर इत्यादी कारणांमुळे जमिनीची धूप होते.
धुपीचे प्रकार
- उसळी धूप (स्पॅलश इरोजन) : पावसाचे पाणी जेव्हा जमिनीवर पडते तेव्हा पावसाच्या प्रत्येक थेंबात एक विशिष्ट स्थळ ऊर्जा असते. हे थेंब फार उंचीवरून जमिनीवर पडत असताना ते मातीच्या कणांसोबत आघात करतात त्यामुळे गतीवृद्धित धूपेला प्रारंभ होतो.
- ओघळी धूप (रिल इरोजन) : पावसाचे थेंब जमिनीवर पडल्यानंतर ते उताराच्या दिशेने वाहू लागतात त्याचबरोबर ते त्याच्या आघाताने विलग झालेले मातीचे कण वाहून नेतात. वाहत असताना अनेक थेंब एकत्र येऊन त्यांचा एक प्रवाह तयार होतो. जमिनीच्या उतारामुळे या प्रवाहास गती मिळून ती सतत वाढत जाते व त्यामुळे भूपृष्ठाची आणखी झीज होऊन या लहान प्रवाहाच्या जागी लहान ओघळ तयार होतो.
- चादरी धूप (शीट इरोजन) : लहान लहान ओघळी एकत्र येऊन त्यांचा मोठा पाणलोट तयार होतो यास अपधाव (रन ऑफ) असे म्हणतात. हे अप धाव पाणी भूपृष्ठावरून चादरीप्रमाणे वाढत जाते व पुन्हा त्यास उतारामुळे गती प्राप्त होऊन ती माती पाणलोटाबरोबर वाहून जाते.
- घळी धूप (गली इरोजन) : भूपृष्ठावरून वाहणारा पाणलोट प्रवाहात परिवर्तित होण्यासाठी मार्ग शोधू लागतो व खोलगट भागात तो केंद्रित होऊ लागतो. अशा प्रकारे घळीचे शीर्ष तयार होते. नंतर हे पाणी खोलगट भागाकडे वाहू लागते व प्रवाह तयार होतो. त्यास आजुबाजूच्या उंच भागावरील पाणलोट येऊन मिळत असतात व प्रवाह विस्तारत जातो. वाढत्या पाणलोटामुळे व प्रवाहाची गती वाढल्याने घळ तयार होऊन जमिनीची धूप होते.
- प्रवाहातील धूप (स्ट्रीम बॅक इरोजन) : वाहत असलेल्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर पाणलोट क्षेत्रात सतत वाढ होत जाते व त्याच्या तळाच्या उतारामुळे त्याची गती वाढत जाते. या वाढत्या गतीमुळे प्रवाहाच्या तळाची तसेच त्याच्या दोन्ही काठाची झीज होत जाऊन प्रवाहाची खोली व विस्तार दोन्ही वाढत जातात.
धूप प्रतिबंधक उपाययोजना
- धूप प्रतिबंधक कृषी मशागत पद्धती
१ |
पिकांची फेरपालट |
वेगवेगळ्या प्रकारची पिके आलटून पालटून घेणे |
२ |
पट्टा पर पद्धत |
सर्वत्र सलग एकच पीक न घेता वेगवेगळ्या प्रकारची पिके वेगवेगळ्या पट्यामधून घेणे |
३ |
समतल मशागत पद्धत |
शेतीसाठी करावायाच्या संपूर्ण मशागती जसे नांगरणी, कुळवणी, पेरणी, कोळपणी इत्यादी उताराला समांतर दिशेत न करता उताराच्या आडव्या व समपातळी रेषेस समांतर करणे |
- धूप प्रतिबंधक यांत्रिकी उपाय :
१ |
समपातळी बांधबंदिस्ती |
उतारामुळे ज्या ठिकाणी उपघाव पाण्यात धुपकारी गती मिळण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी उतारावर आडवे व समपातळीत मातीचे बांध घालून अपघाव पाणी जमिनीत जिरविले जाते. |
२ |
स्थरीकृत बांधबंदिस्ती |
ज्या जमिनीची जलधारणा क्षमता जास्त असते व पाणी जिरविण्याने जमिनीस अपाय होण्याची शक्यता असते. अशा जमिनीत एकदम समपातळीत बांध न घालता त्यास थोडा ढाळ देऊन बांध घातला जातो व बांधाजवळ साठणारे पाणी संथ गतीने व व्यवस्थितपणे बाहेर काढून दीले जाते. |
३ |
पायऱ्यांची मजगी |
ज्या जमिनीचा उतार जास्त असतो व समपातळी बांध घालने शक्य नसते. अशा जमिनीवर टप्प्यां टप्प्याने व अरुंद पट्यात जमीन सपाट केली जाते त्यामुळे उतारावर पायऱ्यांप्रमाणे टप्पे तयार होतात. |
४ |
नाला बांधबंदिस्ती, नाला विनयन, |
पूर नियंत्रण व घळीचे नियंत्रण करण्यासाठी या उपाय योजनाचा वापर करतात. |
५ |
समपातळीत चर खोदणे |
अती तीव्र उतारावर समपातळीत चर खोदणे. |
- जैविक उपाययोजना :
- वनीकरण व वृक्ष लागवड, वणाशेतीचा वापर करावा.
- कुरण विकास, व गवताची शिस्तबध्द लागवड करावी.
- समपातळीत खस गवताची किंवा घायपाताची लागवड करणे.
- धूप नियंत्रण करण्यासाठी, चवळी, कुळीथ, मटकी ही पिके अत्यंत कार्यक्षम असून यांची लागवड करावी.
- भुईमूग वगळता इतर कडधान्याची पिके नेहमीच्या बियाण्यांच्या हेक्टरी प्रमाणात धूप प्रतिबंधक आच्छादन जमिनीवर करू शकत नाही. यासाठी बियाण्यांचे हेक्टरी प्रमाण नेहमीपेक्षा तिप्पट असावे.
- समपातळी पट्टापेर पद्धतींमध्ये अन्नधान्य (ज्वारी, बाजरी) पिकांचा पट्टा ७२ इंच व कडधान्य पिकाचा पट्टा २४ इंच असल्यास हे प्रमाण प्रभावी ठरते.
श्री. शरद केशव आटोळे
साहाय्यक प्राध्यापक मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग.
(कृषि महाविद्यालय,दोंडाईचा)
मो.नंबर-७७४४०८९२५०
सागर छगन पाटील
पीएच. डी. स्कॉलर
कृषिविद्या विभाग, म.फु. कृ. वी., राहुरी
श्री सुनील वसंतराव शिंगणे
एम .एस सी. ऍग्री. (हवामानशास्त्र)
Share your comments