1. बातम्या

राज्यातील शेतकरी आणि तरुणांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण

मुंबई: महाराष्ट्रातील शेतकरी आणि तरुणांसाठी स्वयंरोजगार आणि व्यवसायाकरिता संधी निर्माण होण्यासाठी जवळपास सव्वा तीन लाख शेतकरी आणि तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली.

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
महाराष्ट्रातील शेतकरी आणि तरुणांसाठी स्वयंरोजगार आणि व्यवसायाकरिता संधी निर्माण होण्यासाठी जवळपास सव्वा तीन लाख शेतकरी आणि तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली. आज नवी दिल्ली येथे श्री. पाटील-निलंगेकर यांच्या उपस्थितीत पलेडिअम कन्सल्टिंग इंडियाचे बार्बरा सुराटी आणि सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरचे प्रद्युम्न निंबाळकर यांच्यात करार झाला. यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य सोसायटीचे सह सचिव राजेश अग्रवालमिशन समन्वयक श्री. पवार उपस्थित होते.

प्रगत तंत्रज्ञानाधारित शेती पद्धतीद्वारे राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांना यशस्वी उद्योजक बनविण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2.0 अंतर्गत कृषी क्षेत्राशी संबंधित विशेष प्रकल्प राबविण्याकरिता राज्य शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत राज्यातील शेतकरी तसेच कृषी क्षेत्रामध्ये कार्य करण्यास इच्छुक असलेल्या युवक युवतींकरिता महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

प्रशिक्षण उपक्रमामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक आणि प्रयोगशील शेतीबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण उपक्रमामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक आणि प्रयोगशील शेतीबाबतची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. शेती प्रशिक्षणादरम्यान शेतकरी बांधवांना पीक घेताना नेमके काय प्रयोग करणे आवश्यक आहे याबाबत माहिती मिळण्यास मदत होणार आहे. सामूहिक शेतीमधील प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांनी शेती करताना दडपण वाटू नये आणि शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्रयत्न असणार आहे. शेतकऱ्यांना कृषी आधारित कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्यामुळे गावामध्ये रोजगार निर्मिती होण्याबरोबरच शेतकऱ्यांचा कुटुंबातील तरुण तरुणींना याचा लाभ होण्यास मदत होणार आहे. मोफत देण्यात येणारे प्रशिक्षण 34 जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने होणार असून याअंतर्गत शेतीसाठी उपयोगात येणाऱ्या उपकरणाच्या दुरुस्तीचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.

संबंधित बातमी वाचण्यासाठी: शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य प्रशिक्षण

गट कौशल्य प्रशिक्षण (Mass Skills Training) अंतर्गत Farmer Leaders यांना तीन दिवसांचे वर्ग प्रशिक्षण आणि आठ आठवड्यांचे प्रात्यक्षिक स्वरुपाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणामध्ये ग्रुप फार्मिंग प्रॅक्टिशनर, क्रॉप स्पेसिफिक प्रॅक्टीस/टेक्नॉलॉजी, मार्केट लिंकेज/ग्रुप बार्गेनिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव असून याद्वारे 2000 शेतकरी उत्पादक गट निर्माण करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. वैयक्तिक कौशल्य प्रशिक्षण (Individual Skill Training) अंतर्गत 167 प्रशिक्षण केंद्रामधून 8 अभ्यासक्रमांचे अल्प भूधारक शेतकऱ्यांना तसेच कृषी क्षेत्रामध्ये कार्य करण्यास इच्छुक असलेल्या युवक युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये दोन महिन्याचे वर्ग प्रशिक्षण व एक महिन्याच्या कालावधीचा प्रत्यक्ष अनुभव (Internship) याचा अंतर्भाव असणार आहे.

गट कौशल्य प्रशिक्षण आणि वैयक्तिक कौशल्य प्रशिक्षण या दोन्ही कार्यक्रमाचा कालावधी 18 महिने आहे. गट कौशल्य प्रशिक्षण जवळपास 2 लाख 82 हजार शेतकऱ्यांना दिले जाणर असून यासाठी राज्य शासनामार्फत 146.41 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रशिक्षणाचे मूल्यमापन महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद करणार असून ॲग्रीकल्चर सेक्टर कौन्सिल ऑफ इंडिया याचे प्रमाणीकरण करणार आहे. 44 हजार 238 शेतकऱ्यांना वैयक्तिक प्रशिक्षण दिले जाणार असून यासाठी 42.48 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे सुद्धा ॲग्रिकल्चर सेक्टर कौन्सिल ऑफ इंडिया याचे प्रमाणीकरण करणार आहे.

केंद्र शासनाकडून महाराष्ट्रात गट कौशल्य प्रशिक्षणासाठी (Mass Skills Training) अनुदानाचा पहिला हप्ता म्हणून 31.15 कोटी रुपये 31 जुलै 2018 रोजी देण्यात आले आहेत. विशेष कृती प्रकल्प राबविण्याकरिता सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर, पुणे आणि पलेडिअम कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासमवेत करार करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

English Summary: skill training for farmers and youths in the state Published on: 11 October 2018, 08:56 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters