ऑगस्ट महिन्यात पावसाच्या खंडानंतर गेल्या आठवड्यात राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस फारकाळ टिकला नसला, तरी पाण्याअभावी अडचणीत सापडलेल्या खरिपाला जीवदान मिळाले. पुढील आठवड्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात चांगल्या पावसाचे संकेत मिळत आहेत. तर कोकण आणि विदर्भात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सातत्याने पडणारे खंड, कमी कालावधीत होणारा जोरदार पाऊस आणि असमान वितरण हे यंदाच्या मॉन्सून हंगामाचे वैशिष्ट्य ठरले आहे. ऑगस्ट महिन्यातील कमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. आता नागरिकांना उर्वरित दिवसात तरी चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली, तर पूर्व विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मात्र सरासरी्या तुलनेत अपुरा पाऊस पडला.
पुढील दोन आठवड्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला ाहे. या अंदाजानुसार २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबरच्या दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर कोकण, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच ३ ते ९ सप्टेंबर या दरम्यान उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र विदर्भात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.
दरम्यान पावसाने दिलेल्या खंडामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी तापमान ३३ ते ३६ अंशादरम्यान होते. पुढील आठवड्यात राज्याच्या बहुतांशी भागात कमाल तापमान २८ ते ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० ते २८ अंशादरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच दुसऱ्या आठवड्यात तापमान काही प्रमाणात कमी होऊन कमाल तापमानात पाारा २६ ते ३० अंश राहील.
Share your comments