मुंबई APMC मार्केटमध्ये नियमित विविध फसवणुकीच्या घटना घडत असतात. कडधान्याच्या व्यापाऱ्याची फसवणूक प्रकरण उघडकीस आले आहे. खोट्या नावाचा वापर करून एपीएमसी मार्केटमधील एका धान्य व्यापाऱ्याकडून तांदूळ व डाळींची खरेदी करून तब्बल ३७ लाख ७० हजारांचा गंडा घातला आहे. रोडसिंग चदाना असे फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. रोडसिंग चदाना याने एपीएमसी मार्केटमधील अनेक व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे. व्यापाऱ्यांना लाखोंचा गंडा घातला आहे.
एपीएमसीतील दाणा मार्केटमध्ये महेश जानी हे एम.बी.सोल्यूशन या नावाने कडधान्यांचा घाऊक व्यापार करतात. वर्षभरापूर्वी रोडसिंग चदाना याने मितेश भट या एजंटच्या माध्यमातून महेश यांच्याशी ओळख करून घेतली. यावेळी त्याने आपले नाव चेतन राजपूत असल्याचे व कोलाड येथे श्रीनाथजी ट्रेडिंग या नावाचे दुकान असल्याचे सांगितले होते. महेश यांच्यासोबत कडधान्याचा व्यापार करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांनी कोलाड येथे जाऊन त्याच्या दुकानाची पाहणी करून यांनी एकत्रित व्यवसाय सुरू केला.
हे ही वाचा :
युवा शेतकऱ्याने अवघ्या २४ व्यावर्षी शेतीत केले भन्नाट प्रयोग; २० लाखांचे मिळवले उत्पादन
आनंदाची बातमी: "या" कर्मचाऱ्यांना होळीच्या दिवशी मिळणार पैसे
सुरुवातीला रोडसिंगने याने महेश यांना मालाचे पैसे वेळेत दिले. त्यानंतर मे २०२१ मध्ये रोडसिंगने कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याचे सांगून मोठ्या प्रमाणात कडधान्य पुरविण्यास सांगितले. तसेच सदर मालाची रक्कम त्यांना १० ते १५ दिवसांत देण्याचे कबूल केले. त्यामुळे महेश जानी यांनी मे महिन्यामध्ये त्याला एकूण ४८,४४५ किलो वजनाचा ३७ लाख ७० हजार रुपये किमतीचा तांदूळ व डाळीचा पुरवठा केला. मात्र काही दिवस जाताच तो पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला.
महेश यांनी एपीएमसी मार्केटमधील काही व्यापाऱ्यांना रोडसिंगचा फोटो दाखविला असता, त्याचे नाव चेतन राजपूत नसून तो रोडसिंग चदाना असल्याचे समजले. महेश यांनी कोलाडमध्ये जाऊन रोडसिंगकडे पैसे मागितले असता, त्याने देण्यास नकार दिल्याने अखेर महेश यांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
व्यापाऱ्यांना जवळपास ६० लाखांना गंडा
रोडसिंग चदाना याने महेश जानी यांच्या प्रमाणेच एपीएमसी मार्केटमधील यमुना ट्रेडर्स (२ लाख ९० हजार), डी.एन.ट्रेडर्स (३ लाख ४९हजार), काली महाकाली मसाला ॲण्ड ड्रायफ्रुट (१० लाख ३२ हजार), श्री दर्शन ट्रेडींग कंपनी (२ लाख ९० हजार), महाकाल ऍग्रो (१ लाख ९२ हजार), सिद्धेश्वर स्पाईसेस (३ लाख ४७ हजार) या कंपनीच्या व्यापाऱ्यांकडून माल घेऊन रक्कम न देता फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्यावर ठाणे, पुणे, रोहा व इतर भागात फसवणुकीचे विविध गुन्हे दाखल असून दिवाणी स्वरूपाचे एकूण १४ खटले दाखल झाले आहेत.
हे ही वाचा : नैराश्य जागतिक आरोग्य संकट; नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी करा हे उपाय
Share your comments