राज्यात एकूण ३०६ बाजार समित्या असून बाजार समित्या टिकवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. मात्र, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे 'मोठे घर, पोकळ वासा' हे गणित अनेक गोष्टींमधून स्पष्ट होते. एवढ्या मोठ्या बाजार समितीमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याने बाजार घटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हल्ली छोटी छोटी दुकाने आणि कार्यालयांमध्ये सुरक्षेसाठी अग्निशामक यंत्रणा बसवण्यात येते. परंतू एवढ्या मोठ्या बाजार समितीतील एकही मार्केटमध्ये अग्निशामक यंत्रणा नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विशेष करून आंबा हंगामात फळ बाजार आगीचा आमंत्रक ठरत असून काल रात्रीच १२ वाजता या ठिकाणी आंबा पेटीत टाकण्यात येणाऱ्या गवताच्या गंजीला आग लागली. आग वेळीच आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. मुंबई फळ बाजारात आंबा हंगाम सुरु असून ३० हजार पेटी आंबा बाजारात येत आहे. त्यामुळे बाजारात लाकडीपेटी, गवत आणि पुठे बॉक्स येऊन पडले आहेत.
त्यात आंबा खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत असून आंबा हंगामातील चार महिन्यात सर्वात जास्त लोकांची वर्दळ या ठिकाणी असते. लाकडी पेटी, पुठ्ठा बॉक्स, गवत आणि घास याचा साठा असून या परिसरात काम करणारे कामगार विडीकाडी पिणारे आहेत. त्यामुळे काल लागलेली आग अशाचप्रकारे लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जर आगीने रुद्ररूप धारण केले असते तर बाजारात मोठ्या प्रमाणात वित्त तसेच जीवित हानी झाली असती. आगीसारख्या गंभीर गोष्टीकडे एपीएमसी प्रशासन आणि संचालक मंडळांचे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच मुंबई बाजार समितीमध्ये आगीपासून सुरक्षा होणाऱ्या अग्नीशामक यंत्रणेला महत्व दिले गेले नाही.
त्यामुळे अग्निशामक यंत्रणेअभावी राज्याची प्रमुख बाजार पेठेची सुरक्षा वाऱ्यावर असून प्रामुख्याने फळ बाजार आगीच्या भक्षस्थानी असल्याचे सिद्ध होत आहे. तर आंबा हंगामात दरवर्षी आगीच्या घटना घडत असल्याचे अग्निशमन अधिकारी सांगत आहेत.
महत्वाचा बातम्या;
तांदूळ उप्तादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता होणार उच्च दर्जाची तांदूळ निर्मिती..
इंदापूर तालुक्यास पहिल्यांदाच सलग २१ दिवस पाणी, शेतकऱ्यांमध्ये समाधान...
राज्यातील शिल्लक उसाला मिळणार अनुदान
Share your comments