State Government Scheme :
शिवसेनेच्या शिवसेना प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभरात शेतकरी संवाद यात्रा सुरु करण्यात आली आहे. या यात्रेचा ठाण्यातील टेंभी नाका येथून शुभारंभ करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी श्रीफळ वाढवून या संवाद यात्रेला भगवा झेंडा दाखवला आहे.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे हे शेतकरी प्रश्नांबाबत कायम संवेदशील होते. त्यांनी कायम शेतकरी प्रश्न उचलून धरले. तोच विचार अनुसरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता शेतकरी संवाद यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या यात्रेत शिवसेना शेतकरी सेनेचे पदाधिकारी सहभागी होत आहेत. या यात्रेदरम्यान शेतकरी सेनेचे पदाधिकारी प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. या दरम्यान शक्य झाल्यास तेथेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जाणार आहेत.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिवसेनेच्या शिवसेना प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू झालेला हा प्रवास राज्यातील विविध जिल्ह्यात जाणार आहे. या यात्रेच्या माध्यामातून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहे. शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली जाईल. त्या योजनांचा थेट लाभ देऊन आणि प्रगतीशील शेतकऱ्यांशी बोलून नवीन शेतीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्र्यांना जोडून शेतकऱ्यांशी ऑनलाइन चर्चा करू, असे निवेदनात म्हटले आहे. शेतकर्यांना त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी नवीन आणि आधुनिक शेती पद्धतींची माहितीही दिली जाईल.
Share your comments