1. बातम्या

शौर्य पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली: राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात शौर्य पुरस्कार आणि विशिष्ट सेवा सन्मान प्रदान करण्यात आले.

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात शौर्य पुरस्कार आणि विशिष्ट सेवा सन्मान प्रदान करण्यात आले.

हेड कॉन्स्टेबल रवींद्र बबन धनवाडे यांना मरणोत्तर शौर्य चक्र

दिनांक 26 ऑगस्ट 2017 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) हेड कॉन्स्टेबल रवींद्र बबन धनवाडे यांनी सर्वोच्च बलिदान दिले. हेड कॉन्स्टेबल धनवाडे यांना मरणोत्तर शौर्य चक्र हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांची आई आणि पत्नी यांनी स्वीकारला.

राष्ट्रीय रायफल्सचे महेश सप्रे यांना शौर्य चक्र

राष्ट्रीय रायफल्स ४४ तुकडीचे महेश सप्रे यांनी 3 ऑगस्ट 2018 रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये एका गावात झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांशी दोन हात केले. यामध्ये एका दहशतवाद्याला जखमी केले तर अन्य दहशतवाद्यांना पळवून लावले. त्यांच्या समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली. त्यांच्या या पराक्रमासाठी त्यांना आज शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.

3 मराठी भाषिक सैन्य अधिकाऱ्यांना परम विशिष्ट सेवा मेडल

लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना त्यांच्या सैन्यातील उत्कृष्ट सेवेबद्दल ‘परम विशिष्ट सेवा मेडल’ प्रदान करण्यात आले. यापूर्वी त्यांना ‘अतिविशिष्ट सेवा मेडल’, ‘सेवा मेडल’, ‘विशिष्ट सेवा मेडल’ प्रदान करण्यात आले आहे.

लेफ्टनंट जनरल सुदर्शन श्रीकांत हसबनीस यांना सैन्यातील उत्कृष्ट सेवेबद्दल आज ‘परम विशिष्ट सेवा मेडल’ प्रदान करण्यात आले. यापूर्वी त्यांना ‘विशिष्ट सेवा मेडल’ प्रदान करण्यात आले आहे. मेजर जनरल (निवृत्त) विजय ज्ञानदेव चौघुले यांनाही सैन्यातील सेवेबद्दल ‘परम विशिष्ट सेवा मेडल’ प्रदान करण्यात आले. यापूर्वी त्यांना ‘विशिष्ट सेवा मेडल’ प्रदान करण्यात आले आहे.

3 मराठी भाषिक मराठी सैन्य अधिकाऱ्यांना अति विशिष्ट सेवा मेडल

लेफ्टनंट जनरल शशांक ताराकांत उपासनी यांना सैन्यातील साहसपूर्ण सेवेसाठी ‘अति विशिष्ट सेवा मेडल’ ने गौरविण्यात आले. यापूर्वी त्यांना ‘सेवा मेडल’, ‘विशिष्ट सेवा मेडल’ प्रदान करण्यात आले आहे.

जम्मू आणि काश्मीर रायफल्सचे ब्रिगेडियर संजीव लांघे यांना सैन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी आज ‘अति विशिष्ट सेवा मेडल’ ने सन्मानित करण्यात आले. एअर कमांडर धनंजय वसंत खोत (फ्लाईंग पायलट) यांनी देश संरक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना आज ‘अति विशिष्ट सेवा मेडल’ने सन्मानित करण्यात आले.

English Summary: Shaurya Puraskar 2019 Published on: 15 March 2019, 08:41 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters