राज्यात सर्वत्र फळबाग पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, फळबाग पिकांमध्ये द्राक्ष डाळिंब पपई आंबा या पिकांची राज्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. फळ बागायतदार फळ पिकातून चांगली मोठी कमाई देखील करत असतात, मात्र असे असले तरी पपई पिकाला पाहिजे तसा भाव प्राप्त होत नाही, अनेकदा पपई उत्पादक शेतकऱ्यांना आपली सोन्यासारखी पपई कवडीमोल दरात विकावी लागते. यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीने एक अनोखी शक्कल लढवली होती शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीने पपई पिकासाठी 4 रुपये आणि 75 पैसे प्रति किलो एवढा बाजार भाव निश्चित केला होता. मात्र पपईचे निश्चित केलेले दर हे फक्त कागदावरतीच मर्यादित राहिले निश्चित केलेल्या दराने अद्याप पर्यंत बाजार समितीत पपईची खरेदी केलेली नजरेस पडत नाही.
त्यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांची बाजार समितीने खिल्ली उडवली की काय असा प्रश्न पपई उत्पादक शेतकरी यावेळी उभा करत आहेत. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पपईचे उत्पादन खानदेशात विशेष उल्लेखनीय आहे. ज्याप्रमाणे नाशिकला द्राक्षाची पंढरी म्हणून संबोधले जाते त्याचप्रमाणे खानदेशला पपईचे आगार म्हणून ख्याती प्राप्त आहे. मात्र असे असले तरी राज्याच्या या पपई आगारात दिवसेंदिवस लक्षणीय घट नमूद करण्यात येत आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, पपई पिकाला गेल्या अनेक वर्षापासून कवडीमोल बाजार भाव प्राप्त होत असल्याने खानदेशातील पपईचे क्षेत्र कमी होत आहे. पपईला मिळत असलेला कवडीमोल दर विचारात घेऊन खानदेशातील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळख असलेले शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीने पपईसाठी 4 रुपये आणि 75 पैसे एवढा दर निश्चित केला होता. यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या परत एकदा अशा पल्लवित झाल्या होत्या, शेतकऱ्यांना आशा होती की या निश्चित केलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि खानदेश प्रांतातील घटत असलेले पपईचे क्षेत्र पुन्हा एकदा लक्षणीय वधारेल. परंतु बाजार समितीचा हा ऐतिहासिक निर्णय फक्त चर्चेत राहण्यापुरता करण्यात आलेला आटापिटा होता असे चित्र बघायला मिळत आहे.
अजूनही पपई खरेदी करणारे व्यापारी आपल्या मनाने पपई चे दर ठरवत आहेत आणि यामुळे पपई उत्पादक शेतकर्यांची पिळवणूक होताना दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून पपई पिकाला अतिशय नगण्य बाजार भाव मिळत आहे त्यामुळे पपई पिकाची काढणी देखील पपई उत्पादक शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे सांगितले जात आहे. हेच कारण आहे की, खानदेश मध्ये पपईच्या क्षेत्रात दिवसेंदिवस घसरण नमूद करण्यात येत आहे. शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीने ठरवलेला 4 रुपये 75 पैसे दर हा मुळातच कमी आहे मात्र पपई उत्पादक शेतकऱ्यांनी यावर देखील समाधान मानले होते मात्र, बाजार समितीने ठरवलेल्या दरावर देखील अद्याप पर्यंत व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली दिसत नाही. त्यामुळे अजूनही पपई उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक ही कायम असल्याचे चित्र दिसत आहे.
ज्याप्रकारे पिकांना हमीभाव दिला जातो अगदी त्याच प्रकारे शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीने पपईसाठी 4 रुपये 75 पैसे प्रति किलो दर निश्चित केले होते. पपईला अनेक वर्षापासून कवडीमोल बाजार भाव प्राप्त होत होता आणि त्यामुळे शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीने पपई खरेदी करणारे व्यापारी आणि पपई उत्पादक शेतकरी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीत पपई खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी ज्या दरात पपई खरेदी करण्याचे सांगितलं तोच दर निश्चित करण्यात आला. मात्र असे असले तरी, बाजार समितीत पपईची जास्त आवक झाली की खरेदी करणारे व्यापारी सर्रासपणे पपई उत्पादक शेतकऱ्यांची कत्तल करताना दिसत आहेत. आणि म्हणूनच पपई उत्पादक शेतकर्यांचा दराबाबतचा तिढा हा अद्यापही कायम आहे.
Share your comments