नवी दिल्ली: राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे भारतीय ऊस उद्योगाच्या समस्यांबाबतचा परिसंवाद येत्या 15 मार्च रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. याचे उदघाटन कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष प्राध्यापक विजय पॉल शर्मा, नवी दिल्ली करणार असून भारतीय कृषी संशोधन संस्थेचे प्रमुख डॉ. आर. के. सिंग हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
वैकुंठभाई मेहता नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ कॉपरेटिव्ह मॅनेजमेंट येथे होणाऱ्या या परिसंवादाचा विषय भारतीय ऊस उद्योगाच्या समोरील आव्हाने व त्यावरील उपाययोजना असा असून तो दोन सत्रात चालेल. या परिसंवादात डॉ. ए. डी. पाठक, डॉ. बक्षी राम, विकास देशमुख, डॉ. आर. विश्वनाथन, डॉ. शरणबसप्पा, डॉ. अमरिश चंद्रा, डॉ. पांडुरंग मोहिते आदी तज्ज्ञ ऊस व साखर उद्योग, त्यातील सध्याच्या समस्या यावर मार्गदर्शन करतील.
या परिसंवादास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आमदार श्री. दिलीप वळसे पाटील, उपाध्यक्ष श्री. केतनभाई पटेल, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष श्री. जयप्रकाश दांडेगावकर, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यस्थापकीय संचालक श्री. प्रकाश नाईकनवरे उपस्थित राहून त्यात भाग घेतील.
या परिसंवादाचा लाभ घेण्यासाठी देशभरातील सहकारी व खाजगी कारखान्यांचे 125 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या राष्ट्रीय परिसंवादामध्ये मा. डॉ. बक्षी राम (संचालक, ऊस प्रजनन संस्था, कोईम्बतूर, तामिळनाडू) यांना ऊस वाण को-0238 या जातीच्या निर्मितीबद्दल व त्यांच्या एकूण संशोधनाबद्दल त्यांना 'जीवन गौरव पुरस्कार' देऊन गौरविण्यात येणार आहे, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे मुख्य ऊस सल्लागार डॉ. आर. बी. डौले यांनी सांगितले.
Share your comments