यंदा कोकण हापूस आंब्याबरोबर कर्नाटक आंब्याला दर मिळू लागल्याचे दिसत आहे. कोकण हापूस आणि कर्नाटक हापूसमध्ये प्रति डझन केवळ २०० रुपयांचा फरक असल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे हळूहळू कर्नाटक हापूस कोकण हापूसशी स्पर्धा करू लागल्याचे स्पष्ट होत आहे. तर या दोन आंब्यांमध्ये जास्त काही फरक राहिला नसल्याचे व्यापारी देखील सांगत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात हापूस आंबा विक्री अधिक दराअभावी कमी होईल कि काय अशी चिंता काही व्यापाऱ्यांना सतावत आहे. दोन्ही आंब्याच्या दरात अधिक तफावत नसली तरी स्वस्त मिळणाऱ्या आंब्याला ग्राहक पसंती देतील अशी शक्यता वाटते.
असे असताना कोकण हापूस हा कर्नाटक आंब्याच्या तुलनेत खूपच आकर्षक आणि चविष्ट आहे. मात्र, कर्नाटक आंबा विक्रेते व्यापारी कोकण आणि कर्नाटक यात फारसा फरक नसल्याचे भासवत आहेत. गेल्या वर्षभरात कोकण हापूसच्या नावाने अनेक अनधिकृत व्यापाऱ्यांनी ग्राहकांची फसवणूक केली आहे. तर कमी दराचा कर्नाटक हापूस कोकण हापूस सांगून अधिक दराने ग्राहकांना विकला आहे. यातील काही व्यापाऱ्यांवर त्यावेळी कारवाई देखील झाली होती.
मुंबई APMC मार्केटमध्ये प्रतिदिन हजाराहून अधिक पेटी आंबा विक्रीसाठी येऊ लागला आहे. फेब्रुवारी महिना अखेरीस सहा हजाराहून अधिक पेटी आंब्याची आवक बाजार झाली होती. ग्राहक देखील आंबा खरेदीला पसंती देत आहेत. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोकण हापूस १५५६ तर कर्नाटक हापूस ५६४ पेटी आंबा बाजारात आला आहे. सध्या कोकण हापूस १५०० रुपये डझन तर कर्नाटक हापूस १२०० डझन दराने विकला जात आहे.
मुंबई शहरासह राज्याला आंब्याची प्रतीक्षा लागली आहे. तर फळांचा राजा केव्हा बाजारात येईल आणि खरेदी करू अशी अवस्था देखील अनेकांची झाली आहे. आंबा आवक प्रतिदिन सुरु झाल्याने आंबा हंगामाला सुरुवात झाल्याचे चित्र मुंबई फळ बाजारात दिसू लागले आहे. राज्यातील हापूससह परराज्यातील आंबा आवक पेटी प्रतिदिन हजारी पार गेल्याने व्यापाऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. केवळ आंबा हंगाम करणारे अनेक व्यापारी बाजापेठेत आहेत. त्यामुळे आपल्या गाळा भाडेकरुकडून खाली करून घेऊन आलेल्या मुहूर्ताच्या आंबा पेटीच्या पूजनासाठी व्यापारी सज्ज झाले आहेत.
मुंबई बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आंबा व्यापारी आहेत. मात्र सध्या व्यापाऱ्यांना प्रत्येकी ५ ते १५ अशाच प्रमाणात आंबा पेटी आवक आहे. शिवाय सध्या आंबा नुकताच बाजारात आल्याने त्याचे दर देखील सामान्यांच्या आवाक्या बाहेर आहेत. तर ग्राहकांच्या नजराही आंबा आवकेवर असून केव्हा अधिक आवक होऊन आंबा दर सामान्यांच्या टप्प्यात येतील असे सामान्य ग्राहकांना वाटत आहे.
Share your comments