राज्यातील कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा महाआयटीने घातलेल्या गोंधळाने आता सीमा ओलांडली आहे. पहिल्या फेरीत घोळ घातल्यानंतर आता दुसरी फेरीही स्थगित करण्याची नामुष्की राज्य शासनावर ओढवली.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दुसरी प्रवेश फेरी स्थगित केल्याची घोषणा सोमवारी करताच विद्यार्थ्यांना धक्का बसला. काय चालू आहे, आम्ही कृषी शिक्षण घ्यायचं की नाही असा सवाल विद्यार्थी करत आहेत, याविषयीचे वृत्त अॅग्रोवनने दिले आहे.नियोजनानुसार दुसरी फेरीतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाटप यादी १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाचनंतर प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र, महाआयटीने या यादीच्या कामकाजात घोळ घातला. ही यादी महाआयटीच्या तंत्रज्ञांनी सीईटी कक्षाकडे सादर केलीच नाही. त्यामुळे राज्यभर पालक, विद्यार्थी आणि संस्थाचालकांमध्ये गोंधळ उडाला.
या घोळामुळे सीईटीचे राज्य आयुक्त चिंतामणी जोशी यांना विद्यार्थी व पालकांकडे चक्क दिलगिरी व्यक्त करावी लागली. महाआयटीने यादीत वेळेत सादर केली नाही. त्यामुळे ही यादी आम्हाला जाहीर करता आली नाही. विद्यार्थ्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. महाआयटीने यादी दिल्यानंतर ती आम्ही करू शकतो, आयुक्तांनी सोमवारी घोषित केले.
दरम्यान कृषी पदवी प्रवेशाची प्रक्रिया वेळेत समाप्त करुन एक फेब्रुवारीपासून वर्ग सूरु होणार होते. मात्र यंदा नियोजन पुरते कोलमडले आहे. यंदा विद्यार्थ्यांना सांगितल्याप्रमाणे २९ जानेवारीत पहिली यादी जाहीर झाली नव्हती.
त्यामुळे विद्यार्थी आणि पालक तणावाखाली होती. हा तणाव सतत कसा वाढेल, असा प्रयत्न महाआयटी करीत असल्याचे विद्यार्थ्याचे म्हणणे आहे.
Share your comments