1. बातम्या

उन्हाळी कांद्याची शास्त्रोक्त शेती; मिळणार भरघोस उत्पन्न, जाणून घ्या सविस्तर...

कांदा पिकामध्ये अलीकडच्या काळामध्ये अचानक हवामान बदलाच्या परिणामामुळे, पीक फेरपालट न करणे, रासायनिक खत, कीडनाशक आणि बुरशीनाशकांचा शिफारशींशिवाय वापर होत असल्यामुळे रोग आणि किडींची प्रतिकार क्षमता वाढल्याचे दिसून येत आहे. पिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सरासरी कांदा उत्पादकता कमी झाल्याचे दिसून येत आहे. म्हणून कांदा पिकात एकात्मिक पीक व्यवस्थापन करणे गरजेचे ठरेल.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
summer onion

summer onion

कांदा पिकामध्ये अलीकडच्या काळामध्ये अचानक हवामान बदलाच्या परिणामामुळे, पीक फेरपालट न करणे, रासायनिक खत, कीडनाशक आणि बुरशीनाशकांचा शिफारशींशिवाय वापर होत असल्यामुळे रोग आणि किडींची प्रतिकार क्षमता वाढल्याचे दिसून येत आहे. पिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सरासरी कांदा उत्पादकता कमी झाल्याचे दिसून येत आहे. म्हणून कांदा पिकात एकात्मिक पीक व्यवस्थापन करणे गरजेचे ठरेल.

रब्बी (उन्हाळी) कांदा जाती

एन-२-४-१, अग्रीफाऊंड लाईट रेड, भीमा किरण, भीमा शक्ती, एन.एच.आर.डी.एफ.रेड-३, एन.एच.आर.डी.एफ.रेड-४

पुनर्रलागवड

पुनर्रलागवड करताना १५ दिवस अगोदर चारही बाजूने मका बियाणाची टोकणी करावी जेणेकरून मकाच्या सजीव कुंपणामुळे रसशोषक किडींचा उपद्रव कमी होतो. एक हेक्टर क्षेत्रावर कांदा पुनर्रलागवड करण्यासाठी ६-७ किलो बी पुरेशे होते. परंतु काही शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार ३.७५ ते ४.३७५ किलो बियाणे एक हेक्टर पुनर्रलागवड करण्यासाठी पुरेशे ठरते (१.५ ते १.७५ प्रति एकर). उन्हाळी (रब्बी) कांदा रोपे पुनर्रलागवडसाठी साधारणतः ६० दिवसात तयार होतात. उन्हाळी कांदा पुनर्रलागवड नोव्हेंबर पासून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देखील करू शकतो.

पुनर्रलागवडीसाठी तयार झालेली कांदा रोपे

रब्बी कांद्याची पुनर्रलागवड सपाट किंवा ठिबक संच उपलब्ध असेल तर गादीवाफ्यावर १५ से.मी. x १० से.मी. अंतरावर करतात. पुनर्रलागवडसाठी तयार झालेल्या रोपांना साधारणतः ५-६ दिवस पाणी देणे बंद करावे व लागवासीसाठी रोपे उखडताना १-२ दिवस अगोदर हलक्या स्वरूपात पाणी द्यावे. पुनर्रलागवड करताना वाढलेल्या रोपांचा शेंड्याकडील एक तृतीयांश भाग कापून टाकावा. कार्बोसल्फान २ मिलि व कार्बेन्डाझिम १ ग्रा. प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात रोपांची मुळे बुडवून नंतर पुनर्रलागवड करावी.

कांदा रोप प्रक्रिया

रोपांच्या मुळांच्या प्रक्रियेमुळे काळा करपा, तपकिरी करपा, मर इ. बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकतो. रोप प्रक्रिया करताना काय काळजी घ्यायला पाहिजे किती वेळ प्रक्रिया करावी यासंबंधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी फक्त रासायनिक शेतीशिवाय एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन संकल्पनेचा अवलंब करणे गरजेचे असते. जमीन ही सजीव आहे. जमीन नैसर्गिक खडक, खनिजे, आणि सेंद्रिय पदार्थ यांच्या मिश्रणातून बनलेली आहे. जमिनीची सुपीकता भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म आणि मशागतीच्या पद्धतीवर अवलंबून असते. म्हणून जमिनीची भौतिक आणि रासायनिक गुणधर्माबरोबर जैविक गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असते.

माती परीक्षणानुसार शिफारशीत मात्रेत योग्य वेळी खत देणे महत्वाचे ठरते. माती परीक्षण अहवालानुसार अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेप्रमाणे वर्गीकरण करावे व त्यानुसार खतांची मात्रा द्यावी. जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य (किलो/ हे.) प्रमाण मध्यम असेल तर शिफारशीत खतमात्रा द्यावी. उपलब्ध अन्नद्रव्य प्रमाण अत्यंत कमी तर शिफारशीत खत मात्रेपेक्षा ५० % जास्त खतमात्रा द्यावी आणि जर प्रमाण कमी असेल तर शिफारशीत खतमात्रेपेक्षा २५ % जास्त खतमात्रा द्यावी. जर जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य प्रमाण जास्त असेल तर शिफारशीत खतमात्रेपेक्षा २५ % खतमात्रा कमी द्यावी आणि प्रमाण अत्यंत जास्त असेल तर शिफारशीत खतमात्रेपेक्षा ५० % कमी खतमात्रा द्यावी.

कांद्याचे अपेक्षित उत्पादनासाठी प्रति एकर १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा ४ टन गांढूळ खत देण्याची शिफारस आहे. काही उपयुक्त जिवाणू अद्राव्य स्वरूपात स्थिर झालेला स्फुरद विरघळून ते पिकास उपलब्ध करून देतात. तसेच, पिकांसाठी उपयुक्त असलेले वाढवर्धक द्रव्य तयार करण्याचे कार्यही हे सूक्ष्मजीव करतात. जिवाणू खतांच्या वापरामुळे जमिनीत सेंद्रिय आम्लाचे प्रमाण वाढून जमिनीचा सामू अनुकूल बनण्यास मदत होते.

तसेच, पिकांच्या मुळांना रासायनिक खते उपलब्ध होण्यास मदत होते. जिवाणू खतांमुळे जमिनीची सुपीकता व उत्पादकता (७-१० %) वाढते. एकरी ट्रायकोडर्मा २-२.५ किलो, अझोटोबॅक्टर आणि पी.एस.बी. प्रत्येकी २ किलो सेंद्रिय खतातून देऊ शकतो. जैविक घटक हे रासायनिक घटकांबरोबर देऊ नये. जर ट्रायकोडर्मा, अझोटोबॅक्टर आणि पी.एस.बी. द्रव स्वरूपात असतील तर ठिबक सिंचनाद्वारे देखील देऊ शकतो (साधारणतः पायाभूत रासायनिक खताच्या मात्रेनंतर आठवड्यानी).

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी जिवाणू खतांचा वापर

एकरी १०० किलो निंबोळी पेंड देखील देऊ शकतो. माती परिक्षणानुसार अन्नद्रव्याची (खत) मात्रा द्यावी. रासायनिक खतांचा अपव्यय टाळण्यासाठी खते उघडयावर फेकून न देता निंबोळी पेंड किंवा सेंद्रिय खतांबरोबर मातीआड करून द्यावीत. रासायनिक खते सेंद्रियखतांबरोबर देऊन लगेच पुनर्रलागवड करून मातीआड करावीत व पाणी द्यावे.

रासायनिक खतांची उपलब्धता जमिनीचा सामू ६.५- ७.५ दरम्यान असल्यास चांगली असते. जमिनीचा सामू ८ पेक्षा जास्त असल्यास अशा जमिनीत गंधक भूसुधारक सेंद्रिय खतात मिसळून जमिनीत दिल्यास जमिनीचा सामू कमी होऊन बद्ध झालेला स्फुरद उपलब्ध होण्यास मदत होते. कांद्यासाठी नत्र ४० किलो (युरिया ८७ किलो), स्फुरद २० किलो (सिंगल सुपर फोस्फट १२५ किलो) आणि पालाश २० किलो (म्युरेट ऑफ पोटॅश ३३ किलो) प्रति एकर देण्याची शिफारस आहे. अर्धे नत्र २० किलो (युरिया ४३ किलो), पूर्ण स्फुरद आणि पालाश पुनर्रलागवडीच्या वेळी द्यावे.

उर्वरित नत्र २० किलो (युरिया ४३ किलो) पुनर्रलागवडीनंतर १ आणि १.५ महिन्याने सामान हप्त्याने द्यावे. ठिबक सिंचन पद्धती वापरली असल्यास, लागवडीच्यावेळी एकरी १६ किलो नत्र (युरिया ३५ किलो) द्यावे. उर्वरित २४ किलो नत्र (युरिया ५२ किलो) सहा हप्त्यात विभागून ठिबक संचाद्वारे १० दिवसांच्या अंतराने ६० दिवसापर्यंत द्यावे. खते देण्यापूर्वी माती परीक्षण करून, त्याप्रमाणे तज्ज्ञांच्या सल्ल्याने खताची मात्रा द्यावी. उन्हाळी (रब्बी ) कांदा पुर्नलागवडीपूर्वी एकरी १६-१८ किलो गंधक (सल्फर) मातीत मिसळून द्यावा. गंधक सेंद्रिय खतातून मातीत मिसळून देणे

गंधक (सल्फर) दिलेल्या आणि गंधक विना काढणी पासून ५ महिन्यानंतर ची कांद्याची स्थिती - पिकातील सूक्ष्मअन्नद्रव्ये कमतरता लक्षणांनुसार किंवा जिमिनीत सूक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता असल्यास लागवडीनंतर ३० आणि ४५ दिवसांनी सूक्ष्मअन्नद्रव्ये मिश्रण ग्रेड -४ (लोह ४ %, जस्त ६ % ,मँगेनीस १ %, तांबे ०.५ %, बोरॉन ०.५ %) २ ग्रा. प्रति लिटर पाण्यातून किंवा ग्रेड -२ (जस्त ३ %, लोह २.५ %, मंगल १ %, तांबे १ % आणि बोरॉन ०.५ %) ५ ग्रा. प्रति लिटर पाण्यातून देखील फवारणी करू शकतो. सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या विविध प्रमाणातील मिश्रणांची फवारणी करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

तसेच कांदा पुर्नलागवडीनंतर ३० आणि ४५ दिवसांनी १९:१९:१९ (५ ग्रा./लि. पाणी) आणि ६० ते ७० दिवसांनी १३:००:४५ किंवा ०:०:५० (५ ग्रा./लि. पाणी) या प्रमाणात फवारणी केल्यास कांद्याची फुगवण होऊन अधिक उत्पादन घेऊ शकतो.

तण नियंत्रण

कांदा हे उथळ मुळे असलेले सघन अंतरावर पुनर्रलागवड केलेले पीक असल्यामुळे पुनर्रलागवडी पासून पीक विशेषतः ३०-४५ दिवस तणमुक्त ठेवणे आवश्यक असते. कांदा पिकामध्ये पुनर्रलागवडी जवळपास ४५ दिवसांपर्यंत पीक-तण स्पर्धा जास्त आढळते, त्यामुळे उत्पादनात ६० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. अधिक उत्पादन व तण नियंत्रणासाठी ऑक्झीफ्लोरफेन २३.५ % ई. सी. १ मिली व क्यूझोलफॉप इथाईल ५ % ई. सी. १ मिली या तणनाशकांची प्रति लिटर पाणी प्रमाणे २५ दिवसांनी फवारणी करून पुर्नलागवडीनंतर १.५ महिन्याने १ खुरपणी करावी. काही जमिनीमध्ये सुरुवातीच्या काळातच तणांचा उपद्रव जास्त प्रमाणात आढळून येत असेल तर पुर्नलागवडीच्या वेळी ऑक्झीफ्लोरफेन २३.५ % ई. सी. १- १.५ मिली प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करून तणाच्या उपद्रव व गरजेनुसार ३०-४५ दिवसांनी एक खुरपणी करू शकतो.

करपा, मर रोग आणि फुलकिड व्यवस्थापन

कांदा पिकात करपा आणि फुलकिडी प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुर्नलागवडीच्या ३० दिवसानंतर कीड आणि रोगाच्या प्रादुर्भाव तीव्रतेनुसार गरजेप्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने मॅन्कोझेब २.५ ग्राम अधिक फिप्रोनील १ मिली, प्रोपीकोनॅझोल १ मिली अधिक कार्बोसल्फान २ मिली, कॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ग्राम अधिक प्रोफेनोफॉस १ मिली प्रति लिटर पाणी प्रमाणे अनुक्रमे फवारणी करावी. फवारणी करताना सिलिकॉन आधारित स्प्रेडर चा वापर करावा. मर रोगाचे व्यवस्थापण मेटॅलॅक्सिल अधिक मॅन्कोझेब संयुक्त बुरशीनाशक २ ग्राम प्रति लिटर पाणी या प्रमाणात ओळींमध्ये जिरवणी करून करावे. कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रण करणे अवघड असते म्हणून प्रतिबंधात्मक तसेच कीड व रोग तीव्रतेनुसार व्यवस्थापन करावे.

उत्पादन

उन्हाळी (रब्बी ) कांदा जातीपरत्वे, जमीन आणि वातावरनुसार पुर्नलागवडीनंतर ११० ते १३० दिवसात काढणीस तयार होतो. कांद्याचे उत्पादन जात, लागवड अंतर, जमिनीचा प्रकार आणि वातावरण इ. घटकानुसार बदलते. उन्हाळी (रब्बी) कांद्याचे एकरी सरासरी १०-१४ टन उत्पादन येते. एकात्मिक पीक व्यवस्थापन करून शेतकरी एक एकर क्षेत्रात २४- २६ टन उत्पादन घेतात.

कांदा काढणी व काटणी

कांदा चाळीत साठवून ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी कांदा काढणीच्या १५ दिवस अगोदर कार्बेन्डाझिम १ ग्राम प्रति लिटर पाणी प्रमाणात फवारणी करावी. कांद्याची काटणी २-३ सेमी माना ठेऊन करावी. कांदा १०-१५ दिवस चांगला सुकवून चाळीत साठवावा.

लेखातील कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके इ. लेखकाच्या अनुभवानुसार तसेच कृषिविद्यापीठे आणि कांदा व लसूण पिकांसंबंधी संशोधन करणाऱ्या संस्थांच्या शिफारशींनुसार आहेत. रसायनांचा गट ओळखणे, रसायने एकमेकात मिसळणे तसेच फवारणी करताना सुरक्षेतेची काळजी घेण्याची वैयक्तिक जबाबदारी आहे.

- डॉ. साबळे पी. ए., सहायक प्राध्यापक, उद्यानविदया विभाग, के.व्ही.के, सरदारकृषिनगर दांतीवाडा कृषिविद्यापीठ, साबरकांठा, गुजरात.
- डॉ. सुषमा साबळे, आचार्य पदवी (कृषिविदया विभाग) महात्मा फुले कृषिविद्यापीठ, राहुरी, महाराष्ट्र.

English Summary: Scientific cultivation of summer onions; You will get a lot of income Published on: 15 January 2022, 10:33 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters