भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) एटीएममधून पैसे काढण्यासाठीच्या ओटीपी (वन टाइम पासवर्ड) सुविधेला देशभरात अनिवार्य केले आहे. शुक्रवार, १८ सप्टेंबरपासून हे नियम लागू होणार आहेत.नव्या नियमांनुसार, एसबीआयच्या ग्राहकांना एटीएममधून १०००० रुपये अथवा त्यापेक्षा जास्त पैसे काढताना ओटीपी व्हेरिफिकेशन करणे अनिवार्य झाले आहे. यापूर्वी एसबीआयच्या ग्राहकांना रात्री ८ वाजल्यापासून सकाळी ८ वाजेपर्यंत अशा मर्यादीत कालावधीत या सुविधेचा लाभ घेता येत होता. आता ही सुविधा कायमस्वरुपी लागू करण्यात आली आहे.
एटीएममधून ओटीपीद्वारे पैसे काढण्याच्या सुविधेचे फायदे
एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, एटीएममधून पैसे काढण्याचे अनधिकृत प्रकार रोखण्याचे काम ओटीपी व्हेरिफिकेशन पद्धतीमुळे होणार आहे. एसबीआयच्या ग्राहकांना अधिक सुरक्षितरित्या पैसे काढता यावेत यासाठी ही सुविधा लागू करण्यात आली आहे.
अशी असेल ओटीपीद्वारे पैसे काढण्याची सुविधा
- जेव्हा ग्राहक एटीएममध्ये किती पैसे काढणार याची मागणी नोंदवेल, तेव्हा लगेच एटीएमच्या स्क्रीनवर ओटीपीची विंडो ओपन होईल.
- त्यानंतर ग्राहकाला बँकेकडे नोंदणीकृत केलेल्या त्याच्या मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी क्रमांक तेथे द्यावा लागेल, त्यानंतरच त्याचे ट्रॅन्झॅक्शन पूर्ण होईल.
- ग्राहकाचा जो मोबाईल क्रमांक बँकेकडे नोंदणी केलेला असेल, त्यावरच बँकेकडून ओपीटी क्रमांक पाठवला जाईल. एसबीआयच्या ग्राहकांना एटीएममध्ये होणाऱ्या अनधिकृत ट्रॅन्झॅक्शनपासून वाचविण्याचे काम ही पद्धती करेल.
मात्र, सर्वच ठिकाणांच्या ट्रॅन्झॅक्शनवर ही सुविधा उपलब्ध नसेल. जेव्हा एसबीआय कार्डधारक अन्य बँकेच्या एटीएमवरून पैसे काढतील तेव्हा ही सुविधा त्यांना मिळणार नाही. एसबीआयच्या म्हणण्यानुसार, नॅशनल फायनान्शिअल स्वीचमध्ये (एनएफएस) ही सिस्टीम विकसित करण्यात आली नसल्याने त्याचा वापर अन्य बँकेच्या एटीएममधून पैसे काढताना होणार नाही. एनएफएस ही देशभरात एटीएम नेटवर्क असलेली सर्वात मोठी संस्था आहे. देशांतर्गत इंटरबँकिंग एटीएम सेवेतील ९५ टक्के ट्रॅन्झॅक्शन एनएफएसद्वारे संचलित केले जातात.
Share your comments