नागपूर: राज्यातील 34 हजार गावात 3 लाखांपेक्षा जास्त महिला स्वयंसहायता बचतगट आहेत. या गटामार्फत उत्पादित वस्तुंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येईल तसेच बचतगटांना उत्पादन व व्यवस्थापनासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी केली.
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या प्रांगणात ग्राम विकास व पंचायत राज विभागातर्फे महालक्ष्मी सरस या राज्यस्तरीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंचे महालक्ष्मी सरस हे प्रदर्शन दिनांक 2 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्यानंतर महिलांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादनाबद्दल माहिती घेतली.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, खासदार डॉ. विकास महात्मे आमदार सर्वश्री प्रा. जोगेन्द्र कवाडे, सुधाकर देशमुख, गिरीश व्यास, मल्लीकार्जून रेड्डी, आशिष जायस्वाल, सचिव ग्रामविकास असीम गुप्ता, विभागीय आयुक्त अश्विन मुदगल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर. विमला आदी उपस्थित होते.
महिला बचतगटांच्या चळवळीत राज्यातील 38 लक्ष कुटुंब जुळले असून या माध्यमातून मोठी व्यावसायिक साखळी निर्माण झालेली आहे. लोकसंख्येच्या 50 टक्के असलेल्या महिला शक्तीचा देशाच्या उत्पन्नात वाटा असल्याखेरीज देश पुढे जाणार नाही, असे सांगुन मुख्यमंत्री म्हणाले की, अर्थव्यवस्थेला चालना देण्याची प्रमुख भूमिका महिला करू शकतात. विकासाच्या वाटचालीमध्ये माता भगिनींना सहभागी केल्यास शाश्वत विकास होईल. 5 लाख कुटूंबाची उपजीविका चालवणारी बचतगटाची चळवळ 500 कोटींची उत्पादन क्षमता ठेवते. महिलासाठींच्या वेगवेगळ्या योजनांना आतापर्यंत 42 हजार कोटीचे अर्थसहाय दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर. विमला यांनी केले. ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांनी महिला बचतगट चळवळीचे स्वरुप बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. पुढील तीन महिन्यात राज्यातील बचतगटासाठी ऑनलाईन मंच तयार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती रेणुका देशकर यांनी व आभार रविंद्र शिंदे यांनी मानले.
Share your comments