सांगली - मागील सरकारमध्ये ५ वर्ष कृषी राज्यमंत्री राहिलेले सदाभाऊ खोत लॉकडाऊन काळात एक आंदोलन उभारत आहेत. लॉकडाऊन चालू असताना देखील सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या घेऊन एका आंदोलनाची घोषणा केली आहे. याविषयीची बातमी एबीपी माझा ने दिली आहे. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला होता, परंतु लॉकडाऊनचा काळ शेतकऱ्यांच्या जीवावर उठला. या वाहतुकीची व्यवस्था नसल्याने शेतमाल बाजारात पडून राहिल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक फटका बसला आहे.
लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची व्यथा सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी खोत हे लॉकडाऊनच्या काळात आंदोलन करणार आहेत. दरम्यान लॉकडाऊनचा कोणताही नियम मोडला जाणार नाही. याची दक्षता घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांचा साता बारा कोरा करावा, आधारभूत किंमतीने शेती माल खरेदी करावे किंवा प्रति क्विंटल 1 हजार या अनुदान देण्यात यावे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी देण्यात यावी, दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान द्यावे, कोरोनामुळं फळ-भाजीपाल्याचे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी आदी मागण्यासाठी हे आंदोलन पुकारले जाणार आहे.
'अंगण हेच माझे आंदोलन' या घोष वाक्याखाली हे आंदोलन १५ मे पासून राज्यभर उभारले जाणार आहे. हे आंदोलन अंगणात, शेतात बसून केले जावे आणि सरकार दरबारी शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी दाखवून द्याव्यात असे आवाहन खोत यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केले आहे. शेतकऱ्यांचा सातबारा आणि विविध प्रश्नावर हे आंदोलन करण्यात येत आहे. तमाम शेतकऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळत आंदोलनामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन माजी मंत्री खोत यांनी केले. कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यातला शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून या शेतकऱ्यांना सर्व पातळ्यांवर मदतीचा हात देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
Share your comments