पुणे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यावर रयत क्रांती संघटनेचे प्रमुख नेते सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनाच आता शिल्लक राहिली नाही त्यामुळे पक्षात गटतट काय पडणार? असा सवाल खोत यांनी शेट्टींवर टीका केली आहे.
राजू शेट्टी यांनी संघटनेतील अनेकांचा राजकीय बळी घेतला आहे. तसंच शेट्टींना अनेक सहकारी सोडून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सदाभाऊ खोत आज (दि.८) पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
दिवंगत शरद जोशी यांच्या विचाराने आम्ही एकत्र आलो होतो. पण काही नेतृत्व करण्याची खुजी माणसे ऐकतात. ते बाजार बुणग्यांचं ऐकतात, असं म्हणत खोतांनी राजू शेट्टी यांच्यावर जहरी वार केला आहे.
यावेळी सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन आणि कोअर कमिटीवर देखील टीका केली आहे. ही शिस्तपालन समिती दुसऱ्यादा उदयास आली आहे. अगोदर माझ्यावेळी आणि आता तुपकर यांच्यावेळी. मी या समितीसमोर आलो तरी मात्र तुपकर यांनी समितीलाच फाट्यावर मारले आहे, असेही खोत म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन आणि कोअर कमिटीची आज पुण्यात बैठक आहे. या बैठकीला स्वाभिमानीचे तरुण नेते रविकांत तुपकर उपस्थित राहणार नाहीत, त्यामुळे त्याबाबत कमिटी काय निर्णय घेणार हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.
मी पक्षातच राहणार आणि काम करणार आहे- तुपकर
मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राहूनच कायम करणार असल्याची भूमिका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी घेतली आहे. मी आमुक पक्षात जाणार तमुक पक्षात जाणार, अशी जी अफवा आहे ती थांबवावी, अशी विनंतीही रविकांत तुपकर यांनी केली आहे. रविकांत तुपकर नाराज असल्याच्या मागील काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Share your comments