भारत कृषीप्रधान देश आहे आणि याच कृषिप्रधान देशात जगाचे पालन पोषण करणारा शेतकरी राजाला शेतमाल विकण्यासाठी गेला असताना बाजार समितीच्या आवारात मारहाण झाल्याची शर्मनाक घटना उघडकीस आली आहे. अमरावती जिल्ह्यात ही घटना घडली आहे. त्याचं झालं असं अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर एपीएमसीमध्ये वजन काट्यावर वजन होत असताना खाली पडलेल्या धान्यवरून धान्य विक्रीसाठी आलेले शेतकरी आणि तिथे काम करणारे हमाल यांच्यात वाद चिघळला.
शेतकरी आणि हमाल यांचा वाद शिगेला पोहोचला आणि हमालाकडून शेतकऱ्याला मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे. दर्यापूर एपीएमसी प्रशासनाने संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचे सांगितल्यानंतर हा वाद मिटला असल्याचे सांगितले गेले. हमालावर बाजार समिती प्रशासन कारवाई करेल मात्र, कृषिप्रधान देशात शेतकरी राजा शेतमाल विक्रीसाठी गेला असताना त्याच्यासोबत झालेली ही मारहाण शेतकऱ्यांवर किती अन्याय होतो याची ग्वाही देण्यासाठी पुरेशी आहे.
शेतकरी राजा मोठ्या कष्टाने, घाम गाळून शेतीमध्ये पिकांची जोपासना करतो आणि मग कुठे धान्याची शेतकऱ्यांना प्राप्ती होत असते. मात्र, तळहाताच्या फोडाप्रमाणे ज्या शेतमालाची शेतकऱ्यांनी काळजी घेते असते तोच शेतमाल बाजार समितीत त्याच्या डोळ्यासमोर हमाल लोक पायदळी तुडवत असतात, यातून हमाल लोक शेतमालाची कपात करत असतात. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असते. याचीच प्रचिती समोर आली ती दर्यापूर एपीएमसीमध्ये, ज्ञानेश्वर पांडुरंग वडतकर हे शेतकरी एपीएमसी मध्ये धान्य विक्रीसाठी आले होते, काटा करत असताना हमाल लोक धान्याची नासाडी करत होते म्हणून ज्ञानेश्वर यांनी याबाबत हमालास विचारणा केली, मात्र उर्मट हमालाने उत्तर देण्याऐवजी अरेरावी करत शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यासोबत मारहाण केली. त्यामुळे एपीएमसीमध्ये शेतकरी बांधवांनी रास्ता रोको केला, रास्तारोको झाला असल्याने एपीएमसीमध्ये बराच काळ वातावरण तापलेले बघायला मिळाले.
ज्ञानेश्वर आपले धान्य विक्रीसाठी एपीएमसीमध्ये घेऊन आले होते, ज्यावेळी त्यांच्या धान्याचा काटा चालू होता त्यावेळी बरेच धान्य जमिनीवर पडत होते. म्हणजे हे अप्रत्यक्ष रीत्या मापात पाप करण्यासारखेचं होते. धान्य जमिनीवर पडत असताना देखील हमाल त्याकडे दुर्लक्ष करीत होते म्हणून ज्ञानेश्वर यांनी हमालास याबाबत सांगितले. मात्र, हमाल ज्ञानेश्वर यांच्या सोबत डोकं लावू लागले आणि इथे अशीच पद्धत असल्याचं उर्मट उत्तर देऊ लागले. शेवटी दोघांमध्ये वाद टोकाला पोहोचला आणि याचे रूपांतर हाणामारीत झाले. असे सांगितले गेले की, हमाल लोकांनी मिळून ज्ञानेश्वर यांच्या समवेत मारहाण केली. शेतकऱ्यावर झालेल्या या अन्यायाविरोधात इतर शेतकऱ्यांनी आवाज उठवत रस्ता रोको केला. बाजार समिती प्रशासनाने घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वाद अजून शिगेला पोचण्याआधी मध्यस्थी करत हमालावर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन वाद मिटवला.
Share your comments