शेतकरी आणि त्याच्या शेतात उभे असलेले पीक याचे नाते हे काही औरच असते. शेतकरी आपल्या शेतातील पिकाला अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे जीव लावत असतो. चार ते पाच महिने अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले गव्हाचे पिक आगीच्या भोवऱ्यात सापडू नये आणि जळून खाक होऊ नये म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र सोन्यासारख्या गव्हाच्या पिकाला वाचवतांना या शेतकरी राजाला आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील शहादा तालुक्याच्या मौजे बामखेडा येथील रहिवाशी शेतकरी संजय एकनाथ चौधरी वय वर्ष 56 हे शेजारच्या शेतात लागलेली उसाची आग आपल्या शेतातील गव्हाच्या पिकाला लागू नये म्हणून आग विझवत असताना मृत्युमुखी पडले.
मौजे बामखेडा येथील गणेश पटेल यांच्या उसाच्या फडात काल दुपारी आग लागली. शॉर्टसर्किटमुळे गणेश यांच्या उसाच्या फडात अग्नितांडव घडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग विझवण्यासाठी शेजारी शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली मात्र तरीदेखील आग विझली नाही याउलट अक्राळविक्राळ रूप धारण करू लागली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला होता मात्र ते अपयशी ठरले आणि गणेश यांच्या फडातील ऊस जळून खाक झाला.
यादरम्यान, उसाच्या फडातील आग आपल्या शेतात येऊ नये आणि आपले लाख मोलाचे गहू पीक आगीच्या भक्षस्थानी जाऊ नये या हेतूने संजय चौधरी यांनी देखील आग विझवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आग विझवताना त्यांचा पाय उसाच्या फडात अडकल्यामुळे त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक माहिती द्वारे समोर येत आहे. सदर प्रकरणाची सारंखेडा पोलीस स्टेशन मध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद देखील केली गेली आहे.
शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून शेती करण्यासाठी तारेवरची कसरत करत आहे. कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी सुलतानी संकटे यामुळे शेतकरी राजा पुरता भरडला जात आहे. नंदुरबार जिल्ह्यातील मौजे बामखेडा येथे घडलेली घटना देखील नियमांवर बोट ठेवणाऱ्या महावितरणच्या कामचुकारपणामुळेच घडली असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. काळ्या आईच्या कुशीत मोठ्या तोऱ्यात वसलेल्या पिकाला हानी पोहोचू नये यासाठी बळीराजाने आपल्या प्राणाची आहुती दिली.
Share your comments