उस्मानाबाद: राज्य शासनाने कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हिस्यांचे पाणी मराठवाड्यात मिळावे म्हणून बंद पडलेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प पुनरुज्जीवन करून 800 कोटींचा निधी देऊन या प्रकल्पाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू केली आहेत. यात प्रामुख्याने टनेल व स्थलरीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. उर्वरित कामांसाठी शासन नाबार्डमार्फत 2 हजार 200 कोटी रुपये लवकरच उपलब्ध करून देणार आहे. या सिंचन प्रकल्पासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही देऊन दुष्काळातील कामांना प्रशासनाने प्राधान्यक्रमाने “मिशन मोड” मध्ये काम करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी उस्मानाबादचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, कामगार कल्याण, कौशल्य विकास मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, खासदार रवींद्र गायकवाड, आमदार सर्वश्री सुजितसिंह ठाकूर सुरेश धस, विक्रम काळे, मधुकर चव्हाण, ज्ञानराज चौगुले, राहुल मोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, दत्ता कुलकर्णी, कैलास पाटील, नितीन काळे, अनिल काळे, मिलींद पाटील, अविनाश कोळी आदींसह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सत्तारूढ झाल्यानंतर कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प पुनर्जिवित करण्यासाठी पर्यावरणीय मंजूरी मिळविण्यात आली. व या प्रकल्पासाठी शासनाने 800 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या अंतर्गतची कामे वेगाने सुरू आहेत व पुढील कामांसाठीही दोन हजार 200 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. दुष्काळी परिस्थितीवरील उपाययोजना राबवताना प्रशासनाने मिशन मोडवर काम करावे तसेच या काळात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी देऊन चारा नियोजन योग्य पद्धतीने करून रब्बी हंगामात शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी बी बियाणे उपलब्ध करून देण्याची सूचना केली.
मागेल त्याला शेततळे योजना सर्व जिल्ह्यांना देण्यात आलेली असून दिलेले उद्दिष्ट हे किमान असून या अंतर्गत जास्तीत जास्त शेततळे घेतली पाहिजेत. उस्मानाबाद जिल्ह्याने 3 हजार 717 उद्दिष्टांपैकी 2 हजार 520 शेततळी पूर्ण केली असून हे उद्दिष्टापेक्षाही खूप कमी काम आहे. या कामात अधिक लक्ष घालून मोठ्या प्रमाणात शेततळे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
कमी पावसात मागेल त्याला शेततळे योजना महत्त्वाची आहे. या योजनेत शेतकऱ्यांने एकदा ऑनलाईन अर्ज केल्यानंतर शेतकऱ्याला अर्ज देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करून शेततळे झालेल्या ठिकाणी सामाजिक आर्थिक चांगला परिणाम होत आहे, असे त्यांनी सूचित केले. मुख्यमंत्री म्हणाले, उस्मानाबाद जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याच्या योजनेवर झालेल्या कामांचा निधी नॉर्मसप्रमाणे द्यावा व त्या व्यतिरिक्तचा निधी विशेष बाब म्हणून उपलब्ध करून द्यावा, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उमरगा तालुक्याचा जरी दुष्काळी तालुक्यामध्ये समावेश झाला नसला तरी ॲग्रीकल्चर दुष्काळ या प्रकारामुळे उमरगा तालुक्यालाही दुष्काळी तालुक्याच्या उपाययोजना लागू केल्या जातील, असे स्पष्ट केले. तसेच उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात हे शासन यशस्वी ठरले आहे. याबरोबरच उस्मानाबाद आणि पालघर या दोन जिल्ह्यांमध्ये “काऊ क्लब” ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले. ही संकल्पना या दोन जिल्ह्यामध्ये यशस्वी ठरल्यास संपूर्ण राज्यात हा पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. याबाबत त्यांनी पालकमंत्री अर्जून खोतकर यांचा आवर्जून उल्लेख करुन त्यांच्या कामांची प्रशंसा केली.
Share your comments