रत्नागिरी
कोकणामध्ये भात हे महत्त्वाचं पीक मानलं जातं. पण हे पीक आता पावसाअभावी संकटात सापडले आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत. कोकणात पावसाने दडी मारल्यामुळे भात पिकावर आता करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
भात पिकाला सध्या पाण्याची जास्त गरज आहे. पण पाऊस नसल्यामुळे पिकाची नासाडी होऊ शकते अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. तसंच करपा रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र होऊ शकतो त्यामुळे पीक हातातून जाण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आता पावसाची वाट पाहत आहेत.
जून-जुलै महिन्यात कोकणात चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात लागवड करुन घेतली. पण लागवड झाल्यानंतर मात्र पावसाने राज्यभर उघडीप दिली. त्यामुळे आता लागवड झालेली पीके पाण्याला आली आहे. तसंच काही पिकांवर पाण्याअभावी रोगाचा देखील प्रादुर्भाव होऊ लागला आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यातच भात पिकावर आता रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक हातचे जाण्याची भीती वाटत आहे.
Share your comments