1. बातम्या

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून ‘आषाढीवारी’ पूर्वतयारीचा आढावा

प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी, पालखी मार्ग व विसावा स्थानांवर स्वच्छता राखली जाईल, याची विशेष खबरदारी घ्यावी. स्वच्छतेसाठी पुरेशा प्रमाणात फिरती शौचालये आणि अधिक प्रमाणात स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Ashadhivari  News

Ashadhivari News

पुणे : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासह पालखी मार्गावरील रस्ते, पालखीतळ दुरुस्तीसाठीचे प्रस्ताव दोन दिवसांत सादर करा. पालखी मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या अडचणीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्याच्या कामांना मान्यता निधी उपलब्ध करुन देण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आषाढीवारी पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, अपर आयुक्त अरुण आनंदकर, उपायुक्त विजय मुळीक, नितीन माने, दत्तात्रय लांघी, तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सातारा, सोलापूर, नाशिक जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक उपस्थित होते.

मंत्री गोरे म्हणाले, प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी, पालखी मार्ग विसावा स्थानांवर स्वच्छता राखली जाईल, याची विशेष खबरदारी घ्यावी. स्वच्छतेसाठी पुरेशा प्रमाणात फिरती शौचालये आणि अधिक प्रमाणात स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. टँकरमधील पाण्याच्या शुद्धतेबाबत नियमित तपासणी करावी. पाण्याच्या स्रोतांचे शुद्धीकरणही व्यवस्थित होईल याकडे लक्ष द्यावे. पालखी मार्गावरील रेस्टॉरंट, हॉटेल्स यांची स्वच्छता अन्न शुद्धतेची खात्री करावी. तसेच पंढरपूर शहरातील कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ वाहनांची व्यवस्था करावी, पंढरपूर शहरात सोलापूर जिल्हा परिषद पोलीस प्रशासनाने ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवण्यासाठी संयुक्त व्यवस्थापन यंत्रणा तयार ठेवावी, वारीदरम्यान देण्यात आलेल्या कामांसाठी कंत्राटदारांकडून अटी शर्तीचे पालन करुन कामे होण्यासाठी त्यांच्यावर शासकीय यंत्रणेने अंकुश ठेवावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. ग्रामपंचायतींना आगाऊ निधी देण्याची व्यवस्था करण्यात येईल असे सांगून पालखी सोहळ्यादरम्यान पिण्याचे पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही देखील मंत्री गोरे यांनी दिली.

विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. स्वच्छ आणि निर्मल वारीसाठी विशेष नियोजन करण्यात आले असून पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी, प्रथमोपचार पेट्या, निवारा केंद्र, हिरकणी कक्ष आदी सुविधांसोबत वारकऱ्यांना आरोग्य सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगून स्वच्छ, निर्मल सुरक्षित वारीसाठी सर्व विभागांनी समन्वय ठेऊन दिलेल्या सूचनांचे पालन करावे तसेच स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेऊन पोलीस वाहतूक विभागाने पाण्याचे टँकर पालखी तळ विसाव्याच्या ठिकाणी वेळेत पोहोचतील याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी मंत्री गोरे यांनी आषाढीवारीच्या अनुषंगाने सर्वच जिल्ह्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली.

English Summary: Review of Ashadhivari preparation by Rural Development Minister Jayakumar Gore Published on: 08 April 2025, 06:35 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters