मित्रांनो आपण सुलतान रेड्याची कहाणी तर ऐकलीच असेल, हरियाणातील सुलतान रेडा देशातील सर्वात महागडा रेडा म्हणून संपूर्ण जगात विख्यात होता. सुलतान रेड्याला करोडो रुपयांची बोली लावली जात असे मात्र सुलतान चे मालक त्याच्या विक्रीसाठी तयार नव्हते, आता याच सुलतानच्या मालकाजवळील एक म्हैस मोठ्या चर्चेत आली आहे. असे सांगितले जाते की, दुधाळ जनावरांना व्यवस्थित खुराक दिला गेला तर त्यांच्या दुधात लक्षणीय वाढ होते, असाच प्रत्यय समोर आला आहे तो हरयाणातून. हरियाणा राज्यातील कैथलं जिल्ह्यातील बुढाखेडा येथील नरेश कुमार यांच्या म्हशीने एक अनोखा आणि नावीन्यपूर्ण किताब आपल्या नावावर केला आहे.
नरेश कुमार महागडे रेडे आणि म्हशी पालन यासाठी संपूर्ण देशात ओळखले जातात. यांच्याच रेश्मा या म्हशीने सर्वात जास्त दूध देऊन एक नॅशनल रेकॉर्ड कायम केला आहे. त्यामुळे नरेश कुमार यांच्या या म्हशीला मोठा डिमांड आला आहे आणि लोक लाखो रुपये घेऊन नरेश कडे म्हैस विकत घेण्यासाठी येऊ लागले आहेत. परंतु नरेश यांना तर रेश्मा ही म्हैस विक्री करायची नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुडाखेडा येथील पशुपालक नरेश कुमार यांनी चार वर्षांपूर्वी हरियाणाच्या हिसारमधील भगना गावातून रेश्मा ही म्हैस सुमारे दीड लाख रुपयांना विकत घेतली होती. ही म्हैस विकत आणल्या पासून तिला सतत चांगला आहार देण्यास सुरुवात केली गेली आणि आता तिने इतके दूध देण्यास सुरुवात केली आहे की तिने देशात सर्वाधिक दूध देण्याचा विक्रम केला आहे.
रेश्माने सर्वाधिक 33 किलो 800 ग्रॅम दूध देऊन एक राष्ट्रीय विक्रम कायम केला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB) ने गेल्या वर्षी रेश्मा वेतात असताना एक आठवडा दूध काढले होते. आणि आता काही दिवसांपूर्वीच एनडीडीबीने रेश्मा ही देशातील सर्वाधिक दूध देणारी म्हैस असल्याचे प्रमाणपत्र नरेशला पाठवले आहे. रेश्मा म्हशीचे मालक नरेश आणि त्याचे कुटुंबीय तिला चांगला खुराक देत असतात त्यामुळे रेश्मा अधिक दूध देण्यास सक्षम झाली आहे. रेश्माला फक्त हिरवा चाराच दिला जात नाही, तर मिनरल, कोंडा, मिश्रण, गूळ, मोहरीचे तेल इत्यादी पदार्थांचा तिचा खुराक मध्ये समावेश केला गेला आहे.
त्यामुळे तिचे दूध काढण्यासाठी दोन जण लागतात. नरेशने जेव्हा ही म्हैस विकत आणली तेव्हा दीड लाख रूपये दिले होते आता रेश्मा देशातील सर्वात जास्त दूध देणारी म्हैस बनलेली असताना तिची किंमत काय असेल, असे नरेशला विचारले असता, त्याने रेश्माला विकण्यास नकार दिला आणि रेश्माला विकण्याची गरज नसल्याचे सांगितले. पण असे असले तरी अनेक लोक साडेसहा लाख रुपये पर्यंत द्यायला तयार आहेत, असे त्यांनी नमूद केले.
Share your comments