1. बातम्या

मराठी विश्‍वकोश निर्मितीसाठी नोंद लेखन कार्यशाळा संपन्‍न

राज्‍यातील शेतीच्‍या विकासात कृषी शास्‍त्रांचे मोठे योगदान असुन मराठी विश्‍वकोशात कृषी शास्‍त्रांशी निगडीत अनेक माहितीचा अभाव आहे. यासाठी कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापकांनी आपआपल्‍या विषयातील मा‍हितीचे नोंद लेखन करून मराठी विश्‍वकोश अद्ययावत करावा, ही एक कृषी शास्‍त्रज्ञांची ऐतिहासिक जबाबदारीच आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले.

KJ Staff
KJ Staff


राज्‍यातील शेतीच्‍या विकासात कृषी शास्‍त्रांचे मोठे योगदान असुन मराठी विश्‍वकोशात कृषी शास्‍त्रांशी निगडीत अनेक माहितीचा अभाव आहे. यासाठी कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापकांनी आपआपल्‍या विषयातील मा‍हितीचे नोंद लेखन करून मराठी विश्‍वकोश अद्ययावत करावा, ही एक कृषी शास्‍त्रज्ञांची ऐतिहासिक जबाबदारीच आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात महाराष्‍ट्र राज्‍य मराठी विश्‍वकोशाच्‍या कृषी विज्ञान ज्ञान मंडळाच्‍या वतीने दिनांक 14 नोव्‍हेंबर रोजी लेखकांच्‍या कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते, या कार्यशाळेच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, मंडळाचे सचिव श्री. श्‍यामकांत देवरे, कृषी विज्ञान ज्ञान मंडळाचे समन्‍वयक प्राचार्य डॉ. प्रमोद रसाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, मराठी विश्‍वकोशातील कृषी शास्‍त्राच्‍या माहितीचा शेतकरी, विद्यार्थ्‍यी, शास्‍त्रज्ञ, सामान्‍य नागरीक यांना मोठा उपयोग होणार आहे. त्‍याकरिता बिनचुक, अद्ययावत, नेमकी माहितीची नोंद लेखकांनी करावी, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.

शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, मराठी भाषेत कृषिशी निगडीत शास्‍त्रशुध्‍द, नेमकी व सोपी माहिती इंटरनेटवर मर्यादीतच उपलब्‍ध असुन मराठी विश्‍वकोशाच्‍या माध्‍यमातुन कृषी तंत्रज्ञानाबाबत अधिकृत व योग्‍य मराठी ज्ञान उपलब्‍ध होणार आहे. समन्‍वयक डॉ. प्रमोद रसाळ आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कृषी तंत्रज्ञानाबाबत शास्‍त्रशुध्‍द माहिती इंग्रजी माध्‍यमात मोठया प्रमाणात असुन त्‍या तुलनेत मराठीत फारच कमी आहे. हे ज्ञान पुर्णपणे मराठीत उपलब्‍ध झाले तर या माहितीच्‍या आधारे शेतीत क्रांती होईल.

कार्यशाळेत श्री. श्‍यामकांत देवरे, डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. रविंद्र गोडराज आदींनी मराठी विश्‍वकोशामध्‍ये नोंद लेखन करतांना लेखकांना आवश्‍यक मुद्दयांबाबत सविस्‍तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ. सुभाष शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. संतोष कदम यांनी केले तर आभार डॉ. सचिन मोरे यांनी मानले. कार्यशाळेत विद्यापीठ शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक व कर्मचारी मोठया संख्‍येने सहभाग नोंदविला होता.

महाराष्‍ट्र राज्‍य मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळाच्‍या वतीने मराठी विश्‍वकोशाचे वीस संहिता खंड मुद्रित स्‍वरूपात प्रकाशित करण्‍यात आले असुन हे सर्व खंड मराठी विश्‍वकोशाच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहेत. तसेच खंडातील माहिती कार्ड पेनड्राईव्‍ह व मोबाईल अॅपच्‍या स्‍वरूपात देखील आहे. कृषीशी निगडीत माहितीच्‍या अद्ययावतीकरण राज्‍यातील चारही कृषी विद्यापीठाच्‍या मदतीने कृषी विज्ञान ज्ञान मंडळाच्‍या माध्‍यमातुन सुरू आहे.

English Summary: Record Writing Workshop concluded for the creation of Marathi Encyclopedia Published on: 21 November 2018, 07:22 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters