राज्यात खूप मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. राज्यातील खान्देश मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग तसेच विदर्भात कापसाचे उत्पादन घेतले जाते. असे असले तरी खानदेश समवेतच राज्यातील सर्वच विभागात या खरीप हंगामात कापसाच्या क्षेत्रात लक्षणीय घट नमूद करण्यात आली आहे. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते जिल्ह्यातील भोकरदन तालुका कापसाचे आगार म्हणून संपूर्ण देशात विशेष ओळखला जातो. तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे आठवडी बाजार भरत असतो या आठवडी बाजारात कापसाची देखील विक्री शेतकरी बांधव करत असतात इतिहासात पहिल्यांदाच या बाजारात कापसाला कधी नव्हे तो विक्रमी दहा हजार रुपये पर्यंतचा बाजारभाव प्राप्त झाल्याचे चित्र नुकतेच समोर आले आहे.
खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला मोठा फटका बसला होता, यामुळे कापसावर बोंड आळीचा प्रादुर्भाव वाढून कापसाच्या उत्पादनात घट झाली होती. कापसाचे आगार अर्थात भोकरदन तालुक्यात देखील उत्पादनात मोठी घट झाली आणि याचाच परिणाम म्हणून तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल असा दर प्राप्त झाल्याचे तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यात सुमारे 60 टक्के कापसाच्या उत्पादनात घट झाल्याचे समजत आहे. ही एवढी मोठी घट झाली असल्यानेच कापसाला विक्रमी बाजार भाव मिळत असल्याचे चित्र भोकरदन तालुक्यासमवेतच संपूर्ण राज्यात यावेळी बघायला मिळत आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मते यंदा कापसाला जरी विक्रमी बाजार भाव प्राप्त होत असला तरी कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक नाही त्यामुळे वाढलेला बाजारभावाचा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एवढा फायदा होतांना दिसत नाही. कापसाच्या उत्पादनात घट झाली मात्र बाजारभावात वृद्धी झाली त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा तर झालाच नाही मात्र तोटा देखील झालेला नाही एवढं नक्की.
खरीप हंगामात सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने भोकरदन तालुक्यात जवळपास 45 हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड केली गेली होती, मात्र कपाशीचे पीक फळधारणेच्या अवस्थेत असतानाच निसर्गाच्या लहरीपणाचा प्रत्येय भोकरदन तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आला. कपाशी पिक फळधारणेच्या अवस्थेत असताना, तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता त्यामुळे एवढ्या मोठ्या क्षेत्रावर लागवड केलेल्या कपाशी पिकाला मोठा फटका बसला आणि याचा परिणाम सरळ उत्पादनावर बघायला मिळत आहे. तालुक्यात यापूर्वी कधीच कापसाला एवढा भाव प्राप्त झालेला नाही, कापसाला मागील हंगामापर्यंत जेमतेम पाच ते सहा हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतच बाजार भाव मिळत असल्याचे येथील स्थानिक शेतकरी सांगत आहेत.
मात्र सध्या मिळत असलेल्या बाजार भावामुळे कापूस उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचे चित्र तालुक्यात यावेळी बघायला मिळाले. फरदड कापसाला देखील उच्चांकी भाव मिळत असल्याने तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी कापसाचे फरदड उत्पादन घेतले आहे. मात्र कृषी वैज्ञानिकांनी कापसाचे फरदड उत्पादन घेऊ नये असा सल्ला दिला आहे, मात्र असे असले तरी हात खर्चाला पैसे होतील या आशेने तालुक्यातील अनेक शेतकरी उत्पादन घेताना बघायला मिळत आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांनी कापसाच्या बाजारभावात अजुन वाढ होईल आणि कापसाचे बाजार भाव 15 हजार रुपये प्रति क्विंटलच्या घरात जातील अशी आशा बाळगून कापसाची साठवणूक केली असल्याचे चित्र देखील तालुक्यात बघायला मिळत आहे.
Share your comments