सध्या देशात फक्त पुष्पा या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. हा चित्रपट खूपच गाजत आहे. यामुळे या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. या चित्रपटात रक्तचंदनाची तस्करी कशी केली जाते हे दाखवले गेले आहे. अभिनेता अल्लू अर्जून या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. आता अशीच एक घटना आंध्र प्रदेशातील नेल्लोरजवळ उघडकीस आली. नेल्लोर पोलिसांनी रक्तचंदन तस्करी विरोधात एक मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह फॉरेस्ट एरियामध्ये रक्तचंदनाची झाडे तोडणाऱ्या 55 मजुरांना आणि तीन तस्करांना पोलिसांनी पकडले आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरु आहे.
याबाबत एका गुप्तचरने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी नेल्लोरजवळच्या रापूर जंगलात ही कारवाई केली. त्यांच्याकडून अनेक तस्करीची प्रकरणे पुढे येण्याची शक्यता आहे. यामध्ये वेलोर दामू हा मुख्य तस्कर आहे. तो चित्तूर जिल्ह्यातील वीबीपुरम भागातील आरेगावचा रहिवासी आहे. तो गेल्या काही दिवसांपासून पुद्दुचेरीतील कुप्पण्णा सुब्रमण्यम या व्यक्तीच्या संपर्कात होता. त्यांनी अनेक मजुरांसह नेल्लोर जिल्ह्यातील गुडूर गाठले. तिथे असलेल्या रापूरच्या जंगलात त्यांनी रक्तचंदनाची झाडे तोडली आणि 21 जानेवारी रोजी रात्री लाकडाने भरलेले ट्रक तमिळनाडूकडे रवाना केले. यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांनी ही झाडे तोडली होती. त्याची किमती लाखोंच्या घरात आहे.
याबाबत पोलिसांना सुगावा लागला होता, त्यांना माहिती मिळताच रक्तचंदन भरलेल्या वाहनांचा शोध सुरू केला असता चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर दोन संशयित ट्रक आढळले. पोलिसांनी या ट्रकचा पाठलाग केला. पोलिसांनी लाकूडतोड करणारे मजूर व तस्करांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पथकावर दगड आणि कुऱ्हाडीने हल्ला केला. यावेळी दोन्ही बाजूने हल्ले करण्यात आले. मात्र पोलिसांसमोर त्यांचा निभाव लागला नाही. पोलिसांनी 55 मजूर आणि तीन तस्करांना पकडले.
अटक केलेल्या टोळीकडून पोलिसांनी रक्तचंदनाची 45 खोडं, 24 कुऱ्हाडी, 31 मोबाईल फोन, एक टोयोटा कार आणि 75 हजार 230 रुपये रोख असा मुद्देमाल जप्त केला आहे. ही एक मोठी कारवाई मानली जात आहे. अनेकदा याठिकाणी या झाडांच्या वादावरून मोठा रक्तपात झाला आहे. अनेकांचे बळी देखील गेले आहेत. यामुळे आता या कारवाईमुळे अनेकांचे धागेदोरे यामधून समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. रक्तचंदनाला जगभरात प्रचंड मागणी आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी रक्तचंदनाची झाडे आहेत. दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतील जंगलांमध्ये मुबलक प्रमाणात रक्त चंदन आढळते.
Share your comments