केंद्र सरकारने जे कृषी विधेयक पास केले, त्या विधेयकांना भारतामध्ये विशेषत: पंजाब, हरियाणासह महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी शेतकरी संघटना आणि राजकीय पक्ष विरोध करीत आहेत. असे असताना केंद्र सरकारने जो कृषी सुधारणा कायदा आणला आहे. तो शेतकऱ्यांच्या हिताचा असून त्यामुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळणार आहे. यामुळे रयत क्रांती संघटनेच्यावतीने सटाणा, नामपूर नाशिक याठिकाणी शेतात गुढी उभारून या कायद्याचे समर्थन करण्यात आले.
शेतकऱ्यांना शेती मालाच्या विक्रीची नवीन व्यवस्था उपलब्ध होणार असून विविध बाजार समित्यांच्या अनेक जाचातून शेतकरीवर्ग आता मुक्त होणार आहे. मार्केट कमिटीच्याबाहेर शेतमाल विकण्याची मुभा शेतकऱ्यांना आता मिळणार आहे. एवढेच नाही तर सरकारी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालविक्री नंतरची भीती नष्ट होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी या कायद्याचे स्वागत करावे, असे आव्हान रयत क्रांती संघटनेने केले आहे. शेतकऱ्यांना स्वातंत्र्य बहाल करणारे हे विधेयक केंद्र सरकारने लोकसभा व राज्यसभेत मंजूर करून शेतकऱ्यांना स्वातंत्र्य दिले.
या कायद्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना शेती मालाचे स्वातंत्र्य लाभले आहे, ही मागणी स्व. शरद जोशी यांनी चाळीस वर्षांपासून लावून धरली होती. परंतु यावर निर्णय भूमिका कोणत्याही शासनाने आतापर्यंत घेतली नव्हती. त्यामुळे या कायद्याचे रयत क्रांती संघटना गुढी उभारून या कायद्याचे स्वागत करीत आहेत. यावेळी दीपक पगार, युवराज देवरे संतोष पगार, योगेश काकडे या मान्यवरांसह जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share your comments