सरकार कडून राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळाची घोषणा करण्यात आली आहे. या शासन निर्णयावर तुपकरांनी आक्षेप घेत उर्वरित महाराष्ट्र काय हिरवा आहे का? असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे. एल्गार रथयात्रेवेळी ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात काल दि.5 रोजी शेगाव येथून एल्गार रथयात्रा सुरु झाली आहे. संत गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शन घेत या यात्रेला सुरवात करण्यात आली.
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १ नोव्हेंबर पासून होणारी एल्गार रथयात्रा सूरू होणार होती. मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा म्हणून ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. शेतकरी, शेतमजूर, तरुण, महिला बचत गट, तरुणांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी तुपकर यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे.
सोयाबीन आणि कापसाला दरवाढ मिळावी. पिवळा मोझॅक, बोंड अळी व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी प्रतीएकर १० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या एल्गार रथयात्रेतून करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर, तरूण व महिला या एल्गार रथयात्रेत सहभागी होत आहेत. शेगाव तालुक्यातील गौलखेड,जलंब, पहूरजीरा येथे या यात्रेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून आला. आता ही यात्रा शेगाव तालुक्यातून खामगाव तालुक्यात पोहचली आहे.
Share your comments