Lok Sabha Elections 2024 : देशभरात आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. राज्यात देखील सर्वच पक्षांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मूठ बांधण्यास सुरुवात केली आहे. काही पक्ष युतीत लढणार असल्याने त्यांचे देखील निवडणूक लढण्यासाठी जागेचा फॉर्म्युलाबाबत बोलण होतं आहे. यातच आता शेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचे नेते रविकांत तुपकर देखील तयारी केली आहे. रविकांत तुपकर यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचा इशारा दिला आहे. (Ravikant Tupkar on Buldana Lok Sabha Elections 2024) ही निवडणूक लढणार आणि जिंकणार देखील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी एबीपी माझा मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी निवडणूक लढणार आहे. यामुळे संसदेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची संधी मिळणार आहे. मी गेल्या २० वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करतोय. त्यामुळे मी १०० टक्के संसदेत जाईलच. ज्या प्रश्नासाठी मी लढतोय, त्या प्रश्नाचं मूळ दिल्लीत आहे आणि म्हणून सगळ्या शेतकऱ्यांचा आणि तरुणांचा माझ्यावर दबाव आहे की, तुम्ही लोकसभा निवडणूक लढून दिल्लीला जायला पाहिजे आणि सरकारला आमचे प्रश्न सोडवायला भाग पाडलं पाहिजे. म्हणून येणारी लोकसभा निवडणूक लोकसहभागनं आणि लोक वर्गणीतून आम्ही लढणार आहोत.
पुढे ते म्हणाले की, 'एक व्होट आणि एक नोट'या तत्त्वावर मी निवडणूक लढणार आहे. जनतेच्या आर्शिवाद आहे यामुळे मी १०० टक्के बुलढाणा लोकसभा निवडणूक लढणार असून जिंकणार सुद्धा. मी फाटका माणूस, माझ्याकडं पैसे नाहीत. मी भ्रष्टाचार करत नाही. माझ्याकडे नंबर दोनचे पैसे नाहीत, असं देखील तुपकर यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. दरम्यान स्वाभिमानीकडून दरवेळी सहा जागा लोकसभेच्या लढवल्या जातात. पण यावेळी माझ्या भागातील शेतकऱ्यांचा निर्णय आहे की, लढायचं आणि तेही स्वतंत्र. त्यामुळे मी बुलढाणा लोकसभेतून लढणार आहे, असंही तुपकर म्हणालेत.
Share your comments