Lok Sabha Elections 2024 : बुलढाणा लोकसभेतून स्वतंत्र लढण्याच्या निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर ठाम आहेत. दरवेळी लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजू शेट्टी निवडणूक लढण्याची घोषणा करतात पण ऐनवेळी युती होते. यामुळे सामान्य कार्यकर्त्यांचा यात बळी जातो. यामुळे यंदाच्या निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचा निर्धार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे.
मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाने घेतलेल्या मुलाखीत तुपकर म्हणाले की, लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही स्वतंत्र लढण्याची घोषणा करते. मात्र नंतर मग कुठेतरी कोणासोबत युती होते आणि त्यात आमच्यासारख्यांचा बळी जातो. गेल्यावेळी ही राजू शेट्टींनी मला बुलढाणा लोकसभेसाठी तयारी करायला लावली मात्र ऐन वेळेवर त्यांची युती भाजप सोबत झाली आणि मला मग माघार घ्यावी लागली, असं ते यावेळी म्हणाले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा निर्णय आहे की मी स्वतंत्र लढावे म्हणून मी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यावर मी ठाम आहे.
'एक व्होट आणि एक नोट'या तत्त्वावर मी निवडणूक लढणार आहे. जनतेच्या आर्शिवाद आहे यामुळे मी १०० टक्के बुलढाणा लोकसभा निवडणूक लढणार असून जिंकणार सुद्धा. मी फाटका माणूस, माझ्याकडं पैसे नाहीत. मी भ्रष्टाचार करत नाही. माझ्याकडे नंबर दोनचे पैसे नाहीत, असं देखील तुपकर यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान स्वाभिमानीकडून दरवेळी सहा जागा लोकसभेच्या लढवल्या जातात. पण यावेळी माझ्या भागातील शेतकऱ्यांचा निर्णय आहे की, लढायचं आणि तेही स्वतंत्र. त्यामुळे मी बुलढाणा लोकसभेतून लढणार आहे, असंही तुपकर म्हणालेत.
स्वाभिमानी लोकसभेच्या कोणत्या ६ जागा लढवणार?
कृषी जागरण मराठीने घेतलेल्या मुलाखतीत राजू शेट्टी यांनी लोकसभेच्या जागाबाबत स्पष्ट केले आहे. यावेळी ते म्हणाले की, हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, परभणी आणि बुलढाणा या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत बुलढाणा लोकसभेसाठी स्वाभिमानीकडून कोणता उमेदवार जाहीर होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
माध्यमांशी संवाद साधताना राजू शेट्टी यांना तुपकर यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, बुलढाणा लोकसभा मतदारसंघ रविकांत तुपकर यांच्यासाठी सोडणार आहोत. पण तुपकर स्वतंत्र लढणार असतील तर चांगलंच आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. पण तुपकर यांनी स्वाभिमानीकडून निवडणूक लढवावी अशी अपेक्षा आहे, असं शेट्टी म्हणालेत.
Share your comments