मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसानं राज्यात धुमाकुळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, मका, द्राक्षबागा यांसह इतर हाताशी आलेली पिके पावसामुळे वाया गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्रीय ग्रहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे.
अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील पिके जमीनदोस्त झाली आहेत. छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, नंदुरबार, वाशिम, नाशिक, नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलं आहे. फळबागा, पोल्ट्री फार्म, शेततळे, वाहने, शेड, तसेच घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भांडवली नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने कर्जाचा बोजा वाढल्यानं हतबल झालेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करुन त्यांना आधार देणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचं राजू शेट्टींनी पत्रात म्हटलं आहे.
राजू शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाढलेली महागाई , पडलेले बाजारभाव, वाढलेला उत्पादन खर्च याबरोबरच अस्मानी आणि सुलतानी संकटामुळं शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. राज्यात झालेल्या या नुकसानीमध्ये सर्वाधिक फटका द्राक्ष आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. या शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिक जमिनदोस्त झाल्यानं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने पंचनामे करुन संबधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे असंही राजू शेट्टींनी पत्रात म्हटलं आहे.
Share your comments