ऊसदरासंदर्भात स्वाभिमानीच्या वतीने राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यासंबंधी 21 नोव्हेंबरपर्यंत तोडगा न निघाल्यास महामार्ग रोखण्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. मागील हंगामातील उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये द्यावा आणि यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रूपये द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.
१३ सप्टेंबर पासून ऊस दरासाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर पर्यंत आक्रोश पदयात्रा काढण्यात आली होती. ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे २२ वी ऊस परिषद झाली. तसेच ७ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडागंणावर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. मात्र अजूनही ऊस प्रश्नावर तोडगा निघालेला नाही त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
ऊस दरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तीन वेळा बैठका घेण्यात आल्या होत्या. तरीही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नसल्याने काल सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. त्याचबरोबर राज्य सरकारला ऊस दरावर चर्चा करण्यास वेळ नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये त्यांना कोणताही रस दिसत नाही, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. दरम्यान यासंबंधी 21 नोव्हेंबरपर्यंत तोडगा न निघाल्यास महामार्ग रोखण्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे.
Share your comments