स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमध्ये आंदोलन करत आहेत. त्यांच्यासोबत अनेक शेतकरी देखील आहेत. शेतकऱ्यांना दिवस वीज मिळावी, यासाठी त्यांचे आंदोलन सुरूच आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शेतीला रात्रीची वीज दिल्यामुळे सर्पदंश, जंगली जनावरांचे हल्ले अशा कारणांमुळे शेतकऱ्यांची मृत्यू होत आहेत. अपघात वाढत आहेत. ही बाब राजू शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिली. शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा मिळाला पाहिजे, ही भूमिका त्यांनी मांडली. या मागणीवर ते ठाम राहिले. यामुळे हे आंदोलन सुरूच आहे.
असे असताना राजू शेट्टी यांची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आदींसह लोकप्रतिनिधींनी भेट घेतली. मंत्री मुश्रीफ यांनी शेट्टी यांना आंदोलन थांबवून मुंबईत मंत्रालयात ऊर्जामंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊ या, असे आवाहनही केले. परंतु शेट्टी याने बैठकीतून काही ठोस निर्णय होत नसल्याचे सांगत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे यावर कधी तोडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या आंदोलनाला शेतकऱ्यांचा पाठींबा वाढतच चालला आहे.
या आंदोलनासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर मदत करत आहेत. शेतकऱ्यांकडून १ हजार भाकऱ्या तांदूळ गोडेतेलाची मदत केली आहे. सर्व आंदोलनकर्ते आंदोलनस्थळीच राहत आहेत. त्याचठिकाणी ते जेवण देखील करत आहेत. यामुळे इतर शेतकरी त्यांची जेवनाची सोय करत आहेत. धरणे आंदोलनस्थळी पोहोचताच मंत्री मुश्रीफ यांनी शेट्टी व शेतकऱ्यांशी चर्चा केली. मुश्रीफ यांच्या पुढाकाराने महावितरणचे कार्यकारी संचालक विजय सिंगल, महावितरणचे सचिव वाघमारे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलणे झाले.
असे असताना मात्र यातून शेट्टींचे कोणतेही समाधान झाले नाही. त्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे आता निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी रात्रीची लाइट दिल्यामुळे एका शेतकऱ्याचे नुकतेच निधन झाल्याचे देखील सांगितले. यामुळे आता सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र सध्याच्या रात्रीच्या विजेमुळे मात्र शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.
Share your comments