कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या सावटात राज्याच्या विधिमंडळाने आजपासून अधिकारी व कर्मचार्यांची उपस्थिती 15 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 3 ऑगस्टपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी विधिमंडळातील अधिकारी व कर्मचार्यांच्या उपस्थितीत वाढ करण्यात आली आहे. विधिमंडळ सचिवालयाने कर्मचार्यांच्या उपस्थितीसंदर्भात एक आदेश जारी केला आहे. ज्यामध्ये संबंधित विभागाचे सचिव व कक्ष अधिकारी यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.
दरम्यान मंत्रालयानंतर राजभवनात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता विधिमंडळातही कोरोनाच्या वाढत्या प्रदुभवामुळे चिंतेचे वातावरण आहे. कोरोनामुळे विधिमंडळातील एका क्लर्क टायपिस्ट यांचे निधन झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत विधिमंडळातील 16 ते 17 कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 8 ते 9 पोलिसांचा सहभाग आहे. यापैकी अनेक जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. पुन्हा अधिवेशन तयारी आणि नव्या नियमानुसार कामावर रुजू होणार आहेत.
विधिमंडळात जवळपास 850 कर्मचारी कार्यरत असून नव्या नियमानुसार किमान 400 कर्मचाऱ्यांना हजर राहावे लागणार आहे. 22 किंवा 23 जुलै रोजी कामगार सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत पावसाळी अधिवेशनाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र तत्पूर्वी अधिवेशनातील तारांकित - आतरांकित प्रश्न - उत्तरं घेणे, संबंधित अधिकाऱ्यांचे पासेस बनवणं, सुरक्षा आढावा या सर्व कामकाजासाठी अधिकच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती गरजेची आहे.
Share your comments