राज्यातील बहुतांश भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. राज्यात कोल्हापूर, अकोला, परभणीसह अनेक ठिकाणी पूरस्थिती असून अनेक घर पाण्याखाली गेली आहेत. पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज आणि उद्या मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोल्हापुरातल्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. मराठवाड्यात देखील पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातल्या नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
कसारा घाटात रेल्वे रुळावर दरड कोसळल्यानं लांबपल्ल्याच्या गाड्या रखडल्या आहेत. कसारा बाजूच्या ट्रेन टिटवाळ्यापर्यंत चालू आहेत तर कर्जत बाजूच्या गाड्या अंबरनाथपर्यंत चालू आहेत. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून 21 जुलै रात्री 10.30 वाजता इम्पॅक्ट वॉर्निंग प्रसिद्ध करण्यात आली होती. यात फ्लॅश फ्लडची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यात कमी वेळात अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळं रस्ते, रेल्वे, हवाई वाहतुकीला अडथळ्या सोबतच जुन्या इमारतींना धोका असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने रात्रभर झोडपून काढले आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत चालली असून, पंचगंगा नदी आता इशारा पातळीच्या दिशेने वाटचाल करत आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. अगदी तशीच परिस्थती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फूट 8 इंचावर पोहोचली असून यामध्ये गेल्या 12 तासात पाणी पातळी साडे तीन फुटांनी वाढली आहे. ज्यावेळी पंचगंगा नदी 39 फुटांवर पोहचते त्यावेळी इशारा पातळी मानली जाते.
Share your comments