राज्यात एका बाजुला कोरोनाचे संकट असताना अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. नाशिक, औरंगाबाद, पुणे, सातारा, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटांसह दुपारी व सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर सोंगणीला आलेला गहू, ज्वारी, हरभरा, मका, ही पिके आडवी झाली आहेत. नाशिक जिल्ह्यात कांदा आणि द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, मालेगाव, निफाड तालुक्यांमध्ये पावसामुळे गहू तसेच द्राक्षबागांची हानी झाली. शिर्डीतही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
दरम्यान उन्हाचा चटकाही वाढत आहे. दुपारपर्यंत उकाड्यातही चांगली वाढ झाली तर दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह गारपीट आणि पावसाला सुरुवात होत आहे. अरबी समुद्रापासून कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, दक्षिण मध्यप्रदेशापर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर तसेच राजस्थानपासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटकपर्यंत समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ही स्थिती पोषक ठरल्याने आज राज्यात वादळी पावसाचा अंदाज आहे. तर तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील तापमानाचा पारा वाढला आहे. सोलापुर, अमरावती. मालेगाव, जळगाव येथील तापमान ३९ अंश सेल्सिअस होते.
Share your comments