राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने गुरुवारी हजेरी लावली. बुधवारीही मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह इतर भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला होता. या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान पुढील पाच दिवस राज्यावर पावसाचे सावट असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. गुरुवारी झालेल्या पुर्वमोसमी पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, टोमॅटोसह भाजीपाला पिके, द्राक्ष, आंबा, काजू बागांसह चार पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
बुधवारी मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्हा आणि शहराच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. विदर्भास उत्तर महाराष्ट्रातही अवकाळी पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यात हलक्या सरी कोसळल्या. द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात असताना झालेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादकांची धाकधूक वाढली आहे. जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस झाल्याने भाजीपाला, गहू, हऱभरा, जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले आहे. मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात ३१ मार्चपर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बुधवारी व गुरुवारी राज्यातील बहुतांश भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. काही भागात गारपीट झाली. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अहवालानुसार, अरबी समुद्रापासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ , दक्षिण मध्य प्रदेशापर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच राजस्थानपासून गुजरात, मध्य महाराष्ट्र , कर्नाटकापर्यंत समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. परिणामी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे.
Share your comments