राज्यात मॉन्सून सक्रिय असल्याने कोकण, दक्षिण - मध्य महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. तर मराठावाडा आणि विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पावसाने काहीशी मोकळीक दिली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी रायगड, कोल्हापूर, जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. तर कोल्हापूर, सांगलीत नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मात्र राजधानी दिल्लीच्या नागरिकांना अजून उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे १९० मिलीमीटर पाऊस झाला. रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले. कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील सर्व नद्यांचे पाणी वाढत आहे. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून दमदार पावसामुळे अनेक शेतात पाणी साचल्याने सर्व कामे ठप्प झाली आहेत. दरम्यान दुष्काळी भागातही वरुण राजा बसरल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यात चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानाची स्थिती कायम आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस पडला.
राज्यात वरुण राज्याने कृपा दाखवली आहे. मात्र राजधानी दिल्लीत मात्र नागरिकांना अजून उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. गुरुवारी राजधानी दिल्लीच्या तापमानाचा पारा हा ४६ अंश सेल्सिअस होता. भारतीय हवामान विभागाच्या मतानुसार, कमाल तापमान ४६.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दरम्यान आज शुक्रवारी ढगाळ वातावरण होते परंतु हवा उष्ण होती. साधरण २७ जून पर्यंत दिल्लीत मॉन्सून येत असतो परंतु यावेळी दोन ते तीन दिवसाआधीच दाखल होणार आहे. हवामान विभागाच्या मते २२ जून पासून दिल्लीत मॉन्सूनच्या पावसाला सुरुवात होऊ शकते.
शनिवार आणि रविवारी हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
Share your comments