नवी दिल्ली: क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी महाराष्ट्रकन्या नेमबाज राही सरनोबत यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज अर्जुन पुरस्कार तर रुस्तम-ए-हिंद दादू दत्तात्रय चौगुले यांना ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात आला.
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने आज राष्ट्रपती भवनाच्या दरबारहॉल मध्ये ‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2018’ चे वितरण करण्यात आले. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) राजवर्धनसिंह राठोड, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री सर्वश्री रामदास आठवले आणि विजयसिंह सांपला, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाचे सचिव राहुल भटनागर यांच्यासह विविध क्षेत्रातातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या शानदार कार्यक्रमात नेमबाज राही सरनोबत आणि रुस्तम-ए-हिंद दादू दत्तात्रय चौगुले यांना ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रत्येकी पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.
कोल्हापुरात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत राही सरनोबत या नेमबाजीमधील 25 मीटर 0.22 स्पोर्टस पिस्टल प्रकारातील आघाडीच्या नेमबाज आहेत. नुकतेच जकार्ता (इंडोनेशिया) येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत त्यांनी भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण तर याच वर्षी आशियाई स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक पटकावले होते. 2008 साली झालेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले सुवर्णपदक पटकाविले. त्यानंतर 2010 साली नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दादू दत्तात्रय चौगुले यांनी कोल्हापुरात हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवले. दादू चौगुले यांनी 3 मार्च 1973 ला मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुपर हेवी गटात ‘रुस्तम-ए-हिंद’ हा मानाचा किताब पटकावला. त्यानंतर 3 एप्रिल 1973 ला नवी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत सुपर हेवी गटात ‘महान भारत केसरी’ हा किताब पटकावला. दादू चौगुले यांनी 1970 मध्ये पुणे येथे व 1971 साली आलिबाग येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत ‘महाराष्ट्र केसरी’ हा किताब पटकावला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी ध्यानचंद पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
क्रिकेटपटू स्मृती मानधना यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. मात्र, श्रीलंकेत सुरु असलेल्या क्रिकेट सामन्यामुळे त्या आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहू शकल्या नाहीत. या कार्यक्रमात भारोत्तोलक एस.मीराबाई चानू आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांना मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. एकूण 6 श्रेणींमध्ये 34 खेळाडू व प्रशिक्षक आणि 3 संस्थांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
Share your comments